मिलिंद सोसायटी येथे रस्त्याची दुरावस्था; पाणी गळतीमुळे खड्ड्याचे साम्राज्य
जनसंघर्ष न्यूज
धुळे - शहरातील साक्री रोड भागातील विद्यावर्धिनी कॉलेज समोरील नकाणे रोड येथे जाणाऱ्या रस्त्याला पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून मिलिंद सोसायटी येथे रस्त्याची दुरावस्था झाली असून जीव घेणे खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.
या ठिकाणी महानगरपालिकेतील पाणी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत 10 ते 12 वेळेस खड्डे खोदून पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले पण पाणी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईन दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी गळती होत आहे पालिका प्रशासनाकडे चांगले अनुभवी कर्मचारी नाहीत का असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
यामुळे नळाला पाणी येते तेव्हा हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असते व या पाणी गळतीमुळे चांगल्या रस्त्याची दुरावस्था होत असून मोठमोठे खड्डे तयार होत आहेत या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे तेथे रोज अपघात होत असतात. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात असून स्थानिक पुढारींनी देखील पाठ फिरवलेली दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून वाहतूकदारांना जीव घेण्या खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागत आहे महापालिका प्रशासन व स्थानिक पुढारी तेथे एखाद्याचा अपघात होऊन जीव जाण्याची वाट बघत आहे का ?
महानगरपालिकेतील पाणी प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी वेळीच येथे वैयक्तिक लक्ष घालून सर्व पाईपलाईन दुरुस्ती करून व पाणी गळतीमुळे झालेल्या रस्त्याची दुरावस्था ठीक करून या खड्ड्याच्या साम्राज्यातून जनतेला मुक्त करावे अन्यथा राजीनामा द्यावा अशी स्थानिक नागरिकाकडून मागणी होत आहे.

