बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील हिरा हरपला

जनसंघर्ष न्यूज 

आज, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वृत्तांनुसार, गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआरचे प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. ते ७५ वर्षांचे होते.

🕯️ नाना पाटेकर : अभिनयाच्या आकाशातील धगधगता तारा हरपला

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.

१ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या विश्वनाथ पाटेकर यांनी ‘नाना पाटेकर’ या नावाने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे परिंदा, प्रहार, अंगार, क्रांतिवीर, तिरंगा, अग्निसाक्षी, खामोशी, अब तक छप्पन, अपहरण, राजनीती, वेलकम आणि नटसम्राट यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची विविध रूपे दाखवली.

नाना पाटेकर केवळ अभिनेता नव्हते, तर ते दिग्दर्शक आणि रंगभूमीवरील कलाकारही होते. प्रहार : द फायनल अटॅक या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. गंभीर भूमिका असो, खलनायक असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा—प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप उमटवण्याची त्यांची क्षमता होती. वेलकममधील ‘उदय शेट्टी’पासून नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांपर्यंत त्यांच्या अभिनयाची व्याप्ती प्रचंड होती.

त्यांच्या अभिनयाला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. परिंदा आणि अग्निसाक्षीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, तर क्रांतिवीरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवला. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

नाना पाटेकर यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा नैसर्गिक आणि वास्तववादी अभिनय. पडद्यावर ते भूमिका साकारत नसून ती व्यक्तीच जगत आहेत, असा अनुभव प्रेक्षकांना येत असे. त्यांच्या संवादफेकीतला राग, वेदना, विनोद आणि आक्रमकता प्रेक्षकांच्या मनात थेट पोहोचत असे.

🎬 सिनेमा सृष्टीचे मोठे नुकसान

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने केवळ एक अभिनेता गमावलेला नाही, तर एक संपूर्ण अभिनयशाळाच गमावली आहे. त्यांच्या आवाजाची ताकद, चेहऱ्यावरील भाव, संवादफेक आणि व्यक्तिरेखेला जिवंत करण्याची शैली यांची तुलना करणे कठीण आहे.

त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीला समृद्ध केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. नाना पाटेकर यांचे चित्रपट, संवाद आणि अभिनयाची अमिट छाप पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण आदरांजली. 🕯️🙏

लेबल:

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

ओमप्रकाश अग्रवाल हे यशस्वी भीष्म पितामह-महसूलमंत्री बावनकुळे अमृतमहोत्सवानिमित्त ११ शेतकऱ्यांना गोदान :आ.अनुपभैय्यांवर कौतुकांचा वर्षाव.

ओमप्रकाश अग्रवाल हे  यशस्वी भीष्म पितामह-
महसूलमंत्री बावनकुळे 
 अमृतमहोत्सवानिमित्त ११ शेतकऱ्यांना गोदान :आ.अनुपभैय्यांवर कौतुकांचा वर्षाव.









जनसंघर्ष न्युज 

धुळे, ता. ५ : ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवातही अग्रवाल कुटुंबाने दुष्काळी स्थितीचे समाजभान राखत शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली. ११ शेतकऱ्यांना वासरांसह दुभत्या गायींचे दान करतानाच त्यांनी शासनाच्या दुष्काळ निधीसाठी ११ लाखांचा धनादेश देण्याचे जाहीर केले. ओपीजी हे शहराच्या सामाजिक, राजकीय, सहकार, आध्यात्मिक, उद्योग क्षेत्रातले भीष्म पितामह आहेत. त्यांचा जीवनप्रवास संघर्षशील राहिला. राष्ट्रवादाची प्रेरणा घेत त्यांची जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू झालेली वाटचाल भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपमधील विविध जबाबदाऱ्यांनी युक्त आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) येथील खान्देश गोशाळेच्या मैदानावर ओपी शेट यांचा सन्मान, भजनसंध्या, भक्तिमय गीतगायन, शेतकऱ्यांना गोदानाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सत्कारमूर्ती अग्रवाल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशिराम पावरा, माधवी नाईक, रोहिणी नायडू, मंजुळा गावित, राहुल ढिकले, राम भदाणे, अमोल जावळे, राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, महापौर मायादेवी परदेशी, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी प्रमुख पाहुणे होते. 

सरकार अनुपभैयांच्या पाठीशी : बावनकुळे
श्री. बावनकुळे म्हणाले, की सर्वप्रथम धुळे शहरवासीयांपुढे नतमस्तक होतो, की तुम्ही सर्वांनी अनुपभैया अग्रवाल यांच्या रूपाने हिरा कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उत्कृष्ट काम करणारे आमचे जे १० आमदार आहेत त्यातील एक अनुपभैया आहेत. धुळे शहराचे जेही प्रश्न, समस्या आहेत ते सोडविण्यासाठी ते सतत पाठपुरावा करत असतात. आम्हीही त्यांना सहकार्य करत आहोत. आजही ओपीजींनी विधानसभा निवडणुकीत अनुपभैयांनी शहरवासीयांना जी-जी वचने दिली ती पूर्ण करण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. मी धुळेकरांसमोर जाहीर करतो, की अनुपभैयांनी शहर विकासासाठी मागितलेले प्रत्येक काम राज्य सरकार पूर्ण करेल.

ओपीजींची संघर्षातून वाटचाल : मंत्री रावल
पालकमंत्री रावल म्हणाले, की आई-वडिलांमध्येच देव असतो या भावनेतून आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी आपल्या वडिलांचा अमृतमहोत्सवाचा अप्रतिम सोहळा घडवून आणला. ओपी शेट यांनी अत्यंत कष्टातून, संघर्षातून जीवनाची वाटचाल केली. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि नंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली. विविध आंदोलनांतून भाजपची पाळेमुळे या जिल्ह्यात रोवली. त्यांच्याच संस्कारांतून घडलेल्या अनुपभैयांनी दुष्काळी स्थितीचे समाजभान राखत आज वडिलांप्रती ऋण व्यक्त करताना त्यांच्या अमृतमहोत्सवासाठी जमविलेला गोतावळा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. ओपी शेट यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.

ओपीजी हे द्रष्टे व्यक्तिमत्त्व : महाजन
जलसंपदामंत्री महाजन म्हणाले, की ओपी शेट यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस हा त्यांच्या ७५ वर्षांच्या संघर्षाचा, संस्कारांचा आणि समाजसेवेचा दीर्घ प्रवास आहे. जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए याची प्रचिती ओपी शेट यांच्या जीवनप्रवासातून येते. तुम्ही किती वर्षे जगला यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्त्व असते. तुम्ही समाजासाठी, गोरगरीब गरजूंसाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी काय योगदान दिले हे महत्त्वाचे ठरते. ओपी शेट यांचा जीवनपट संघर्षशील असून, त्यांनी नेहमीच सामाजिकतेचे भान राखत जीवनप्रवास केला. त्यांचा जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपमधील योगदान पाहता ते आजही आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. राजकारण, समाजकारण, उद्योग, शिक्षण, सहकार, अर्थकारण आदी क्षेत्रांत वावरताना त्यांनी गोरगरीब, सामान्य जनतेसाठी कार्य केले. माणसे जोडली. अनुपभैयांच्या रूपाने त्यांच्या कुटुंबातून एक चांगला लोकप्रतिनिधी शहराला लाभला. ओपीजींनी त्यांना चांगले संस्कार दिले. ३०० सदस्यांचा हा परिवार आजही एकसंध आहे, याचे सारे श्रेय ओपीजींना आहे. अशा व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

रावेर एमआयडीसीची जागा मंजूर : अनुपभैया
आमदार अग्रवाल म्हणाले, की आज ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत महसूलमंत्री बावनकुळे यांनी आज मोठी भेट दिली आहे. आपल्या सर्वांचे ४० वर्षांपासूनचे एमआयडीसी विस्तारीकरणाचे जे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे. त्यांनी आज रावेर एमआयडीसीसाठी २००० एकर जागा मंजूर केली आहे. यामुळे शहराच्या औद्योगीकरणाला मोठी चालना मिळणार असून, या एमआयडीसीत स्थानिक कुशल-अकुशल मनुष्यबळाला रोजगाराच्या मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे शतशः आभार मानतो.

आमदार अनुपभैया आम्हा सर्वांचे लाडके आमदार
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की अनुपभैया आम्हा सर्वांचे लाडके आमदार आहेत. त्यांनी शहराच्या विकासासाठी सांगितलेल्या व प्रत्येक कामासाठी निधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज आपल्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा पाठविल्या आहेत. त्यांनी सांगितले, की आमदार अनुपभैयाच्या नेतृत्वात धुळे शहर प्रचंड शक्तिशाली बनवू. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज धुळे शहराच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यासाठी आमदार अनुपभैया आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. तो आज यशस्वी ठरला आहे.

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

आय.आय. टी विद्यार्थी साहिल वाकोडे संस्थात्मक हत्या ची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी : सत्यशोधक विद्यार्थी संघटना.

आय.आय. टी. विद्यार्थी साहिल वाकोडे संस्थात्मक हत्या ची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी : सत्यशोधक विद्यार्थी संघटना






जनसंघर्ष न्युज 

धुळे -  शिक्षणातील ब्राह्मणीकरण, बाजारीकरण व जातीय भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक खुनाबाबत तसेच साहिल वाकोडे यांच्या प्रकरणात तातडीची कारवाई करण्याबाबत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी धुळे यांना  निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली.
        सत्यशोधक विद्यार्थी संघटना, धुळे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे आम्ही  आपले लक्ष शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गंभीर प्रवृत्तींकडे वेधू इच्छितो. जागतिकीकरणाच्या काळात शिक्षणाचे ब्राह्मणीकरण व बाजारीकरण जोरदार सुरू झाले आहे. या प्रक्रियेत शिक्षण महाग होत असून, विशेषतः भौतिक उन्नती साधणाऱ्या व प्रतिष्ठित संस्थांमधून मिळणारे शिक्षण उच्च जातवर्गीयांची मक्तेदारी बनविण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवरूनही दिसून येत आहे. परिणामी दलित-बहुजन विद्यार्थ्यांसाठी समान संधीचे दरवाजे संकुचित होत आहेत.
      अशा जातिव्यवस्थाक अडथळ्यांना लांघून प्रवेश मिळविणारे दलित-बहुजन विद्यार्थी विकृत जाती मानसिकतेचे शिकार बनविले जात आहेत. रोहित वेमुला, पायल तडवी व साहिल वाकोडे यांसारख्या अनेक तरुणांचे संस्थात्मक खून जातीपुरुषसत्तेने केले आहेत. या घटनांमध्ये शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव, मानसिक छळ व दबाव यांची स्पष्ट छाया दिसते. असे संस्थात्मक खून पचवण्यासाठी दलित-बहुजन गुणवत्ताविहीन असतात या जातीय मानसिकतेचा आधार घेऊन पीडितांनाच बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते. सध्याचे शासन उच्च जातवर्गीयांची पाठराखण करणारे असल्याने दलितद्वेषाला खतपाणी मिळून अशा व्यक्ती व संस्था अधिक मुजोर बनल्या आहेत.
       या पार्श्वभूमीवर साहिल वाकोडे यांच्या संस्थात्मक खुनाला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने कठोर व पारदर्शक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा आम्ही देत आहोत. न्याय मिळणे व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण तातडीने योग्य ती चौकशी व कारवाई करावी, ही नम्र विनंती. यावेळी सिद्धांत बागुल ,केतन निकम,हर्ष मोरे,धनंजय जगतापश्वेता गवळे,नीलिमा भामरे,मयुरी जाधव,प्रसिका जगदेव,तन्मय ठोसर,सोनाली अहिरे उपस्थित होते.

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाला अखेर मान्यता; दीपक (बंटी) सुरेश खोपडे यांची नियुक्ती



धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाला अखेर मान्यता ; दीपक (बंटी) सुरेश खोपडे यांची नियुक्ती

एम आय एम चे विरोधी पक्षनेता बनण्याचे स्वप्न भंगले; शहर विकास आघाडीला विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष व शहर विकास आघाडी मनपा धुळे गटनेते श्री. शाह शाहबाज फारूक शाह यांच्या पत्रानुसार, महापौर सौ. मायादेवी महादेव परदेशी यांनी नगरसेवक श्री. दीपक (बंटी ) सुरेश खोपडे यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे.

महापौरांनी दिलेल्या पत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १९ एक अ अ (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष आणि शहर विकास आघाडी मनपा धुळे यांच्या गटनेत्यांच्या पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्राची प्रत माहितीस्तव व योग्य कार्यवाहीसाठी मनपा आयुक्त तसेच नगरसचिव यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे धुळे महानगरपालिकेच्या आगामी सभांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून दीपक (बंटी) सुरेश खोपडे यांची अधिकृत भूमिका राहणार असून, महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय समीकरणांना यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

लेबल: , ,

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांच्या हस्ते लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ फलकाचे अनावरण.

 हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांच्या हस्ते लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ फलकाचे अनावरण.





जनसंघर्ष न्युज 


भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथे  दिनांक २४ सप्टेंबर २०२६, गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना, मंत्रालय मुंबई यांच्या वतीने संघटनेच्या फलक अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.

या फलकाचे अनावरण माननीय अधिष्ठाता डॉ अजित  पाठक , वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकरम खान , संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  गिरीश चौधरी तसेच डॉ. अरुणकुमार नागे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळावे, कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांना व अडचणींना योग्य व्यासपीठ मिळावे आणि संघटना अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 *कार्यक्रमास राज्य कार्याध्यक्ष  चंद्रकांत भदाणे, राज्य सचिव  विनोद सोनार, राज्य महिला अध्यक्ष  सरलाबाई शिरसाट, राज्य महिला सचिव कांताबाई वर्पे, राज्य ज्येष्ठ सल्लागार  वामनराव पाटील, तसेच धुळे जिल्हाध्यक्ष  राहुल वाघ,   नंदकिशोर अंबेरे,  गोकुळ पाटील, संजू खैरनार,   अनिल मराठी,  विजय सूर्यवंशी,  अक्षय महाले , धीरज चव्हाण,   संजय माळी, सुनिता गायकवाड,   मिनाबाई गायकवाड,  शोभा अंबुरे,   संजीवनी उईके ,  राधेश्याम देसाई, विठ्ठल तिथे ,भगवान खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तसेच  देवा पगारे , ताराचंद पाटील,  सोमनाथ सोनार,  पवन डांमरे,  विशाल हिरवाळे, कांतीलाल कल्याणी, गणेश गोयर, रेखा पवार,  अनिता लोहरे,  प्राची देशमुख,  अविनाश एडके,  करवादास सूर्यवंशी, देविदास पाटील , सिद्धार्थ जोंधळे,  दुर्गेश लोखंडे,  महेंद्र गोयर, रवींद्र बोरसे , संदीप परदेशी,  गोलू चावरे , सोमनाथ बैसाणे,  देविदास चावरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारे सर्व अधिकारी, कर्मचारी , पदाधिकारी व मान्यवर यांचे महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश भाऊ चौधरी व धुळे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल वाघ यांनी मनःपूर्वक आभार मानले. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी असेच सहकार्य व मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२६

गरोदर महिलेची पेट्रोल टाकून जाळून हत्या ; 275 किमी दूर नेऊन थरारक कट! मोहाडी नगर पोलिसांनी 6 पैकी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या

 


गरोदर महिलेची पेट्रोल टाकून जाळून हत्या ; 275 किमी दूर नेऊन थरारक कट! मोहाडी नगर पोलिसांनी 6 पैकी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून खुनाचा धक्कादायक कट; CCTV, वाहन क्रमांक आणि तांत्रिक तपासातून पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांत उलगडले रहस्य

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : गरोदर महिलेवर पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याच्या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाचा मोहोळीनगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला आहे. तब्बल 275 किलोमीटर दूर नेऊन महिलेची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली आहे.

दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.58 वाजता गर्भवती महिला गंभीर अवस्थेत आढळून आली होती. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरावर गंभीर भाजल्याच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी महामार्गावरील CCTV फुटेज, वाहनांची माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेला. संशयित वाहनाचा शोध घेतल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली. पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका सांस्कृतिक कला केंद्रातून आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिस तपासानुसार, सरफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८), आरिफ उर्फ खुन्या आरिफ शेख (वय ३१), स्वाती उर्फ आरती गणेश कुटे (वय २८), रश्मी बालाजी पवार (वय ३०), फारुख शेख आणि रोहिणी जाधव यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनाक्रमाची पडताळणी केली. महिलेची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ३२२/२०२६, BNS कलम १०३(१) अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहाडीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

लेबल:

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने.

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने


जनसंघर्ष न्युज 

     धुळे -   गुणवत्तापूर्ण शिक्षण हा या देशातील प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. उशिरा का असेना कांही उणिवांसह शिक्षण हक्काचा कायदा आपल्या देशात झाला. पण अलीकडे राज्य आणि केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाचा आधार घेत नवनवे शासन निर्णय करून या देशातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, बहुजन कष्टकरी शेतकरी, अल्पसंख्याक समूहातील मुलामुलींचा शिक्षणाचा हक्कच काढून घेत आहे. आज महाराष्ट्रातील साडे तीन हजार सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. पंधरा हजारहून अधिक सरकारी शाळा बंद पाडल्या जाणार आहेत. ज्या प्राथमिक शिक्षणावर उच्च शिक्षणाचा डोलारा उभा आहे त्याचे सक्षमिकारण करण्याऐवजी त्याचे कंगालीकरण केले जात आहे. सर्व सरकारी प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद करून शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करणारी धोरणे आखली जात आहेत. या शाळांच्या मधून शिक्षण घेणाऱ्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, बहुजन कष्टकरी शेतकरी आणि अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलीना शिक्षणातून हद्दपार केले जात आहे. मुलींच्या शिक्षणाची वाट तर कायमची बंद होणार आहे.
आज महाराष्ट्रात ६४८८४ सरकारी शाळा आहेत. त्यातील १७८ शाळांना स्वतःची इमारत नाही. ४०१ शाळांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ५२२३ शाळांत मुलासाठी तर ३०९५ शाळांत मुलींसाठी स्वछतागृह नाही. १०१९३ शाळांना खेळाचे मैदान नाही.४६८४ शाळांत वीज कनेक्शन नाही. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या ही विदारक अवस्था आहे. म्हणूनच सरकारी शाळांचे कंगालीकरण थांबवून सार्वजनिक शिक्षणवेवस्थेचे मजबूतीकरण करण्यासाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०२६ पासून महत्वाच्या पाच मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे.या आंदोलनापुर्वी शासनापर्यंत आमचे म्हणणे पोहचावे यासाठी सदर निवेदन देण्यात येत आहे.
मागण्या -: 
(१) २० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. गाव, तांडा, वाडी, वस्ती तिथे शाळा हेच धोरण कायम ठेवले पाहिजे. विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू ठेवली पाहिजे. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र्य शिक्षक दिला पाहिजे.(२) गुणवत्तापूर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम करणारा १५ मार्च २०२४ रोजी घेतलेला संचमान्यतेचा शासन निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळाला पाहिजे.(३) नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खाजगीकरण, आणि बाजारीकरण वेगाने होणार आहे. १००० विद्यार्थी संख्येच्या अटीमुळे खेड्यापाड्यातील छोट्या शहरातील महाविद्यालये बंद होणार आहेत. दलित, आदिवासी, ग्रामीण, बहुजन-कष्टकरी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलींना उच्च व महाविद्यालयीन शिक्षणातून हद्दपार केले जाणार आहे.त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण रद्द केले पाहिजे.(४) शिक्षणातील विषमता नष्ट करायची असेल तर केजी टू पीजी सर्वाना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळाले पाहिजे.(५) शिक्षणावर होणारा खर्च हा नाममात्र असून तो वाढवत वाढवत राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्केपर्यंत नेला पाहिजे(६) शालेय कामाच्या कालावधीत शिक्षकांचे मोबाईल बंद ठेवण्यात यावे त्यामुळे अध्यापन करणे सुलभ होईल. (७) मराठी शाळांना अनुदान देण्यात यावे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आले .यावेळी  सिद्धार्थ जगदेव,संजय पवार ,प्रवीण कुमार लाडे,भूपेश वाघ,युसुफ पापा सर ,विनोद रोकडे ,चंद्रकांत सत्तेसा,व्ही टी.गवळे, आप्पासाहेब तायडे,अशपाक खाटिक,मुकेश वाघ, मुकेश निकम, सुरेश सोनवणे, हर्षदा पाटील ,नीलिमा भामरे ,गुलाबराव वाघ, ईश्वर बैसाणे, शमसुल हसन, विशाल जाधव, मोहसीन शेख ,हेमंत भडक , शरद वेंदे, अमीन कुरेशी, नंदिनी पाटील, अशोक सोनवणे,  अब्दुल रऊफ सर, विलास महाले, नितीन पाटील, स्मिता सराट, ॲड.अरुण ढिवरे, अत्ताउरहमान , रियाज अहमद, खतीब सर, नवल ठाकरे, गौस रझा, श्वेता गवळे, देविदास जगताप, मधुकर निकुंभे , प्रविण गवळे, महेंद्र फुलपगारे,प्रशांत फुलपगारे,प्रकाश पाटील,केतन निकम, नानाभाऊ महाले , धनंजय जगताप, प्रसिका जगदेव, हर्ष मोरे.सिद्धांत बागुल, उपस्थित होते.

लेबल: ,