धुळे शहरातील बोगस मतदान कार्ड घोटाळ्याची चौकशी करा
शिवसेना उ बा ठा चे ललित माळी यांची मागणी
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- प्रतिनिधी - शहरातील निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान कार्ड तयार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी जोरदार मागणी केली आहे.
शहरालगतच्या गावांतील आधार कार्डांची गैरवापर…
ललित माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची आधार कार्डे जमा केली जात आहेत. त्यानंतर, शहरातील लाईट बिलाचा आधार घेत बनावट पत्त्यावर मतदान कार्ड मिळवून दिली जात आहेत. यामुळे अशा व्यक्ती बेकायदेशीरपणे शहरातील मतदार यादीत नोंदवले जात असून, निवडणुकीत अपप्रकार घडण्याचा धोका वाढत आहे.
राजकीय फायद्यासाठी मतदारांचा ताळमेळ बिघडवण्याचा डाव?
शहरातील काही राजकीय मंडळी, त्यांच्या समर्थक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला ज्या प्रभागात हवं त्या प्रभागात मतदान कार्ड मिळवून देण्यासाठी दबाव आणत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे प्रभागाचं जनतेचं प्रतिनिधित्व बिघडत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची खरी लोकशाही धोक्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातच गडबड?
याप्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या काही कंत्राटी कर्मचार्यांच्या माध्यमातूनच हे अनैतिक कृत्य सुरू असल्याचा आरोप ललित माळी यांनी केला आहे. जर यामागे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा संगनमत असेल, तर हा प्रकार धुळेकरांच्या भविष्याशी थट्टा करण्यासारखा आहे, असेही माळी यांनी ठणकावून सांगितले.
लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न हाणून पाडा – माळी यांची मागणी
"धुळे शहरात मतदान हे जनतेच्या हक्काचे आहे, त्यात अशा प्रकारे बोगस नागरिकांना घुसवून, मतदार यादीतील प्रामाणिकतेवर गदा आणली जात आहे. जर वेळेत हे थांबवलं नाही तर लोकशाहीची थट्टा होईल. आम्ही याला थांबवण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यासाठी आवाज उठवत आहोत," असे ललित माळी यांनी स्पष्ट केले.
ललित माळी यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:
1) मागील वर्षभरात तयार झालेल्या सर्व नव्या मतदान कार्डांची सखोल तपासणी
2) लाईट बिलाच्या आधारावर तयार झालेल्या मतदान कार्डांची बारकाईने छाननी
3) जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांची सखोल चौकशी
4) दोषींना तत्काळ निलंबित करून योग्य ती कायदेशीर कारवाई
5) भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून कडक उपाययोजना आणि सिस्टममध्ये सुधारणा
निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना उघड करून कारवाई करावी, अशी ठाम मागणी ललित माळी यांनी केली आहे.

