सरवड येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणा-या समाजकंटकावर त्वरित कारवाई करा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

 

सरवड येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणा-या समाजकंटकावर त्वरित कारवाई करा

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे - शहरापासून १०-११ किमी अंतरावर असलेल्या सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहे.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन निव्वळ गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडत असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक दिसून येत नाही.परणामी एकाच गावात दुस-यांदा जातीय अत्याचाराची घटना घडते.एवढेच नाही तर जातीयवादी मानसिकता सामाजिक बहिष्कारापर्यंत जावून पोहचली आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग गौतम गवळे यास जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.घरातील बाबासाहेबांच्या फोटो कडे हात दाखवत शिवीगाळही केली. अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील ही आरोपींची नावे असून. गौतम सोबतच त्याची म्हाताऱ्या आई, आजारी वडील आणि त्याच्या बहिणीला देखील त्यांनी मारहाण केली.वरील घटनेच्या बाबतीत सहा दिवस झाल्यानंतर देखील एकाही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी गावात मोकाट फिरत आहेत. पोलिस कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही. आरोपी प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणत आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सरवड गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाच्या फलकाजवळ  फटाके फोडण्याच्या वादावरून दोन गटात खूप मोठा वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी बैठका घेऊन समझोता केला. परंतु नंतर समोरच्या पक्षाने गावात त्यांची वेगळी बैठक बोलावली व त्या बैठकीत असे ठरवले कि यांना (दलित समाजाच्या लोकांना) दुकानावर येऊ द्यायचं नाही, यांना चक्कीवर दळण दळून द्यायचं नाही, दूध देणे बंद करायचं, यांच्या लोकांना कुठे कामाला लावायचं नाही इत्यादी. याला काही लोकांनी नकार दिला. पण त्यांनी दोन महिलांना  चक्कीवरून परतून दिले. एक जण दूध आणायला गेला असता त्याला दूध दिले नाही, काही महिला  शेतात कामाला गेल्या असता त्यांनाही कामावरून  परतावून लावले. यासंदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळाने सोनगीर पोलिस स्टेशनला भेट दिली असता संबंधित अधिका-यांकडून सांगण्यात आले की,सदर गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या स्तरावरील असून आम्ही काहीही करू शकत नाही.असे उत्तर एकप्रकारची पळवाटच म्हटली पाहिजे.यावरून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते.

अशापद्धतीने सरवड गावात जातीय अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असतांना पोलीस प्रशासन मात्र गुन्हेगारांवर कारवाई करीत नसल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पर्यायाने तालुक्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

    तरी सरवड ता.जि.धुळे येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक  बहिष्कार टाकणा-या प्रवृत्तींच्या विरोधात तीव्र स्वरूपाची कारवाई करण्यात यावी.तसेच दिव्यांग  गौतम गवळे यास अमानुष मारहाण करणारे अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अश्या मागणीचे निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे    

           यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र चे सिद्धांत बागुल , केतन निकम,हर्ष मोरे,धम्मदीप मोरे,निलीमा भामरे ,धनंजय जगताप,सिद्धार्थ बैसाणे  ,दिनेश बैसाणे, श्वेता गवळे,मयुरी जाधव ,विश्वजित वाघ,हरीश वाघ , धनराज झाल्टे ,शरद वेंदे , संदीप बोरसे,सचिन बागुल,अतुल बैसाणे , मनोज नगराळे ,राकेश अहिरे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)