मेहकर येथे शिवसेना कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जनसंघर्ष न्यूज
बुलढाणा प्रतिनिधी - दिपक देशमुख
मेहकर – लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालय, मेहकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ठीक ११ वाजता अभिवादन कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला असून त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, आज महिलांना मिळणारे शिक्षण व सन्मान हे त्यांच्या संघर्षाचे फलित आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व समानतेचा प्रकाश पोहोचवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक निसार अन्सारी, व्यापारी संदीप गारोळे, युवा सेना तालुका अधिकारी ॲड. आकाश घोडे, गजानन पालवे, गोपाल गायकवाड, राजू आव्हाळे, भागवत बोरकर, गणेश गावंडे, राजू गवई, राम कष्ठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

