भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न ; १०१ श्रीफळ वाढवून एकवीरामातेला साकडे

0

 

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न ; १०१ श्रीफळ वाढवून एकवीरामातेला साकडे

पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्याच पाठीशी रहा ; धुळे शहर विकसित,स्मार्ट शहर बनवू 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. ४ :- येथील महापालिकेची येत्या १५ जानेवारीला होऊ घातलेली निवडणूक ही केवळ १९ प्रभागांतील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात २०१४ पासून होत असलेल्या सर्वांगीण विकासाचा रथ अखंड पुढे नेण्यासाठी आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आहे. यामुळे सर्व धुळेकरांनी आताच सावध होत आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य चुकीच्या विचारांच्या, चुकीच्या प्रवृत्तींच्या हातात देण्याऐवजी सब का साथ, सब का विकास या विचाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती सोपवावी. पक्षाच्या सर्व ५९ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, अशी साद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज धुळेकरांना घातली.

१०१ श्रीफळ वाढवून एकवीरामातेला साकडे

शहरातील कान्हदेश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरादेवी मातेच्या मंदिरात १०१ श्रीफळ वाढवून, मातेचे आशीर्वाद घेतल्यानंतर व सर्व उमेदवारांच्या विजयाचे साकडे घालत मंदिरासमोरील प्रांगणात भाजपच्या सर्व ५९ उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, आमदार अनुपभय्या अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्यासह भाजपचे सर्व जिल्हा सरचिटणीस, सर्व मंडळाध्यक्ष यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपचे निवडणूक रिंगणातील सर्व ५९ उमेदवारांसह त्यांचे समर्थक व महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

विकसित , स्मार्ट धुळे बनवू : चव्हाण

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, की या शहराला भगवी झालर लाभली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला समस्त धुळेकर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहत पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करत विजयी करायचे आहे. २०१४ पासून राज्यासह देशभरातील नागरिक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत. २०१४ पासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार ज्या ताकदीने काम करत आहे. त्यानुसार धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, विकसित, स्मार्ट आणि स्वच्छ धुळे बनविण्यासाठी आपण सर्व शहरवासीयांनी महापालिकेतही भाजपची सत्ता आणायची आहे. पक्षाचे आणि उमेदवारांचे कमळ चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी व जनतेची साथ मिळविण्यासाठी उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

विकासाचे व्हीजन तयार : रवींद्र चव्हाण

श्री. चव्हाण म्हणाले, की केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भाजपने महापालिकेत २०१८ पासून सुरू केलेली विकासाची गंगा सातत्याने पुढे वाहती ठेवण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहावे. शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून घरांमध्ये शिरणारे पाणी व त्यातून होणारे नुकसान थांबविण्यासाठी ५१३ कोटींची स्टॉर्म वॉटर योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू. याशिवाय धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जीर्ण झालेली तापी योजनेची जलवाहिनी बदलण्यासाठी २२३ कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध राहू. जनसुविधेच्या प्रत्येक कामाला गती देण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. त्यासाठी तुमची आमची-भाजपा सर्वांची हा नारा घरोघरी पोहोचवा. पक्षाच्या संघटनात्मक ताकदीतून आपण महापालिकेच्या निवडणुकीत ५५ पेक्षा जास्त जागांवर विजय निश्चित साकारू, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. 

तत्पूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भारतीय जनता पक्षाचे आगामी पाच वर्षांतील विकासाचे व्हीजन मांडत त्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

विक्रमी रक्तदानाप्रमाणे आता विक्रमी मतदान करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष स्तरावर सेवाभावी वृत्तीने राबविलेल्या रक्तदानाच्या उपक्रमात महाराष्ट्रातून धुळे शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी विक्रमी रक्तदान करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यासाठी समस्त धुळेकरांचे आभार मानतो. ज्या विश्वासाने धुळेकरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याप्रती प्रेम दाखवत आपले रक्त दिले, त्याच विश्वासातून आता महापालिकेच्या निवडणुकीतही विक्रमी मतांचे दान भाजपला देत पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे. तुम्ही भाजपप्रती दाखविलेल्या या विश्वासाला पक्षाचे वरिष्ठ व स्थानिक नेते कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली. 

जाहीरनाम्याचे प्रकाशन अन् अनेकांचा भाजप प्रवेश

          सभेच्या प्रारंभी विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रतिष्ठित व्यक्तींनी आज मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र पाटील, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक सुमित बोरसे, सामाजिक कार्यकर्ते कपूरचंद बाविस्कर, साक्रीच्या प्रतिभा सूर्यवंशी, छगन सूर्यवंशी, कासारे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम देसले यांच्यासह त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यानंतर महापालिका निवडणुकीसाठी पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हीजन मांडणाऱ्या जाहीरनाम्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)