धुळ्यातील क्युमाईन क्लब परिसरात हमाल कामगारांचे आंदोलन ; २७ मे पासून शासकीय धान्य गोदामे बंदचा इशारा
जनसंघर्ष न्यूज
शासनाने नव्याने काढलेल्या वाहतूक आणि हाताळणी परिपत्रकामुळे हमाल कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे. शासकीय धान्य गोदामांचे काम थेट वाहतूक ठेकेदारांना देण्याच्या या निर्णयाविरोधात 'धुळे जिल्हा हमाल कामगार संघटने'च्या वतीने धुळ्यातील क्युमाईन क्लब परिसरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या धुळ्यातील ३०० आणि राज्यातील तब्बल १० हजार हमाल कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि गोदामातील काम केवळ नोंदणीकृत माथाडी कामगारांनाच मिळावे, या मागणीसाठी आंदोलकांनी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल तसेच जिल्हा प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले आहे.
कामगारांची थकीत मजुरी त्वरित मिळावी, अशी प्रमुख मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, २५ आणि २६ मे असे दोन दिवस हे धरणे आंदोलन सुरू राहील; मात्र तरीही शासनाने या प्रश्नाची दखल घेतली नाही, तर २७ मे पासून धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामांमधील कामकाज बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येईल. पावसाळ्याच्या तोंडावर गोदामांचे काम बंद पडल्यास वितरण व्यवस्थेत मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
