३०-४० वर्षांची आरोग्याची प्रतीक्षा संपली; आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक ललित माळी यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
प्रभाग क्रमांक १ मध्ये NHUM अंतर्गत नागरी आरोग्य दवाखान्याचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरातील उत्तरेकडील भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे ५० ते ६० हजार नागरिकांना मागील ३० ते ४० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य सुविधा सोयीच्या अंतरावर उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आरोग्य सेवांसाठी दूर अंतरावर जावे लागत असल्याने सर्वसामान्य, गरीब व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.
धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या अत्यंत महत्त्वाच्या मागणीस प्राधान्य देत नव्या नागरी आरोग्य दवाखान्याच्या उभारणीस भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनिक स्तरावरील आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आल्या व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठीचे मार्ग मोकळे करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या संवेदनशील व विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या National Health Mission अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या National Urban Health Mission (NHUM) योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील फॉरेस्ट कॉलनी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नागरी आरोग्य दवाखान्याचे उद्घाटन धुळे शहराच्या महापौर सौ. मायादेवी परदेशी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
शहरातील गरीब, सर्वसामान्य व वंचित नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा दवाखाना मंजूर करून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेली ही सुविधा प्रत्यक्षात आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमासाठी नगरसेवक सुभाषजी जगताप, सौ. योगिता कुठे व सौ. उज्वला भोसले यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सरचिटणीस सुनीलजी कपिल, अमोल भाऊ मराठे व संदीप भाऊ गुरव यांनीही सदर दवाखान्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करून या उपक्रमाला सहकार्य केले.
NHUM अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या दवाखान्यामध्ये नागरिकांना OPD तपासणी, रक्त तपासणी, औषध वितरण, माता व बाल आरोग्य सेवा, गर्भवती महिलांची तपासणी व मार्गदर्शन, लसीकरण, रक्तदाब व मधुमेह तपासणी, कुटुंब नियोजन सेवा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे.
विशेषतः झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार असून मोफत उपचारामुळे नागरिकांची आर्थिक बचत होणार आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गंभीर आजार टाळण्यास मदत होणार असून महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी “सुदृढ नागरिक हेच सक्षम समाजाचे बळ आहे” हा संदेश देत नागरिकांनी शासनाच्या आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
उद्घाटन प्रसंगी कॉलनीचे सचिव रवींद्र इंगळे, शिवाजी माळी, अरुण कळाल, दिलीप सुरशे, चौधरी साहेब, मयुर धात्रक, रुपेश सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
