विकासकामांच्या नावाखाली देवपुरात खड्ड्यांचे साम्राज्य! दौलत नगरमध्येही भुयारी गटारीनंतर रस्त्यांची दुर्दशा कायम ; प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष? -शिवसेना आक्रमक !

0

                 

           धुळे: - धुळे शहरात विकासकामांच्या नावाखाली नागरिकांचे हाल सुरूच असल्याचे दिसत आहे. देवपूर भागातील भूमिगत गटार योजनेनंतर रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था ताजी असतानाच, आता दौलत नगरमधील नागरिकांकडूनही याच प्रकारच्या तक्रारी येत आहेत. भुयारी गटारीचे काम पूर्ण होऊनही दौलत नगरमधील रस्ते दुरुस्त न केल्याने तेथील नागरिकांनाही प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी या दोन्ही भागांतील रस्त्यांच्या दुर्दशेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

देवपूरमध्ये नकाने रोडवरील रिया पेट्रोल पंपाजवळील महाकाय खड्ड्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या भागातील रस्त्यांची अवस्था बिकट असून, पावसामुळे ते अधिक धोकादायक बनले आहेत. अनेक अपघात झाले असून, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

आता दौलत नगरमधील नागरिकांनीही रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर काळी माती पसरली आहे. त्यामुळे रस्ते निसरडे झाले असून, चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. देवपूरप्रमाणेच दौलत नगरमध्येही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

ललित गंगाधर माळी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र रस्त्यांची गुणवत्ता आणि कामाची पद्धत यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भूमिगत गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत आणि मोठे खड्डे तयार झाले आहेत. या कामावर देखरेख करणाऱ्या संबंधित यंत्रणांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुका जवळ आल्यावर विकासकामांचे मोठे दावे केले जातात, परंतु देवपूर आणि दौलत नगरमधील रस्त्यांची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे आणि त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे हे गंभीर आणि अक्षम्य आहे, अशी भावना दोन्ही भागांतील नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.

ललित गंगाधर माळी यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. जर प्रशासनाने यावर ठोस पाऊल उचलले नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता देवपूर आणि दौलत नगरमधील नागरिक अधिक जागरूक झाले आहेत. ते आपल्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी एकत्र येत आहेत. येत्या निवडणुकीत विकासकामांच्या नावाखाली केवळ आश्वासने देणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

प्रशासनासाठी ही एक मोठी संधी आहे की त्यांनी तातडीने दोन्ही भागांतील रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा. अन्यथा, विकासकामांच्या नावाखाली झालेले हे खड्ड्यांचे साम्राज्य त्यांच्यासाठी निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते. देवपूर आणि दौलत नगरमधील नागरिक आता केवळ आश्वासनांवर नव्हे, तर ठोस कृतीवर विश्वास ठेवणार आहेत असे शिवसेनेचे ललित माळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)