"चाळीत साठवलेला कांदा सडू लागला; बदलत्या हवामानाने शेतकरी अडचणीत, दरवाढीची प्रतीक्षा"

0

 
बदलत्या हवामानामुळे अडचणीत सापडलेल्या ; कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा

"चाळीत साठवलेला कांदा सडू लागला; बदलत्या हवामानाने शेतकरी अडचणीत, दरवाढीची प्रतीक्षा"

जनसंघर्ष न्यूज

        धुळे :-  बदलत्या हवामानाने सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. काहींनी तर भाडेतत्त्वावर चाळा घेऊन कांद्याचा साठा केला आहे. मात्र, सतत बदलत असलेल्या हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

           धुळे तालुक्यातील आर्णी गावासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असले तरी बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला होता. गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरिपासाठी खर्च करता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळींमध्येच सडू लागला आहे.

          कांद्याला मोठा वास येत असल्याने मजूरही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कांदा चाळी फोडून सडलेला कांदा बाजूला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसतो आहे.

          आर्णी गावातील शेतकरी भगवान पाटील यांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली असून शासनाने या संकटात मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)