आमदार अनुप भैय्यांनी २० हजार रहिवाशांना दिला हक्काचा `सात-बारा’ :- अमोल मासुळे
मिल परिसरातील नागरिकांतर्फे आमदारांचा नागरी सत्कार
धुळे, ता. २५ :- शहरातील मिल परिसरातील जनतेला हक्काचा सातबारा मिळावा यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत होतो. माझा पाठपुरावा निश्चित होता. परंतु विषय तडीस नेण्यासाठी मोठ्या पाठबळाची गरज होती. ते पाठबळ शहराचे कार्यसम्राट आमदार अनुपभय्यांनी दिले. त्यांच्यामुळेच आज मिल परिसरातील २० हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळणार आहे, असे म्हणत माजी नगरसेवक तथा भाजपाचे पूर्व मंडलाध्यक्ष अमोल मासुळे यांनी परिसरातील जनतेतर्फे आमदार अनुप अग्रवाल यंचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.
शहरातील मिल परिसरातील गट क्रमांक 529 मधील 5.15 हेक्टर जागेवरील 102 प्लॉटधारकांनी सातबारा व लेआउट मंजुरीसाठी विनंती केली होती. मात्र, या जागेवरील आरक्षणामुळे प्रक्रियेत अडथळे येत होते. याप्रश्नी आमदार अनुप अग्रवाल यांनी सातत्याने हे आरक्षण रद्द करण्याची मागणी करत शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेल्या आठवड्यात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे झालेल्या बैठकीत हे आरक्षण रद्द करत प्लॉटधारकांना सातबारा उतारे देण्यास त्यांनी मंजुरी दिली. यामुळे मिल परिसरातील रासकरनगर, गुरुकृपानगर, तुळसाबाई मळा, ईखेनगर, श्रीरामनगर, कोरेनगर, सीताराम माळी चाळ, लीलाबाई चाळ, अयोध्यानगर (पिंजारी चाळ), धनगरवाडा, राऊळवाडी आदी भागांतील रहिवाशांना त्यांचा हक्काचा सातबारा मिळणार आहे. यानिमित्त मिल परिसरातील रहिवाशांतर्फे अमोल मासुळेंच्या नेतृत्वात आमदार अग्रवाल यांचा आमदार कार्यालयात भव्य नागरी सत्कार झाला. यावेळी शेकडो प्लॉटधारक महिला-पुरुष उपस्थित होते.
मासुळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
आमदार अग्रवाल म्हणाले, की मिल परिसरातील सुमारे 20 हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळावा यासाठी अमोल मासुळेंनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. महापालिकेत ठराव करण्यापासून ते नाशिक,पुणे मुंबईपर्यंत कागदपत्रांचा प्रवास त्यांनीच घडवून आणला. मी केवळ मंत्रालयातून मंजुरी आणली. मासुळे हे तुमच्या प्रभागातील हक्काचे लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्या घरांना सातबारा मिळण्याचे पक्के झाल्याने जेवढा आनंद तुम्हाला झाला तितकाच आनंद मलाही झाला आहे. कारण मी मिल परिसरातून लहानाचा मोठा झालो आहे. येथील जनतेच्या सुख-दुःखाची जाणीव आहे. त्यांना हक्काचा सातबारा मिळणे किती आवश्यक आहे, याची मला जाण होती. त्यातूनच हा प्रश्न मार्गी लागला.
माझी कामाची शैली वेगळी
आमदार अग्रवाल म्हणाले, की यापूर्वी नगावबारी परिसरातील 650, तर गवळीवाड्यातील 300 जणांना हक्काचा सातबारा दिला. आता मिल परिसरातील 2500 घरधारकांना लवकरच सातबारा मिळेल. कुठलेही काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. आधीच्या आमदारांनी त्यांच्यापरीने प्रयत्न केले असतील. परंतु माझी काम करण्याची शैली वेगळी असून, चांगले काम करतच राहणार. रावेर एमआयडीसीसाठी 2 हजार एकर जागा लवकरच मिळणार असून, तेथे साडेआठ हजार कोटींचे उद्योग येतील. त्यातून मिल परिसरासह धुळ्यातील बेरोजगारांना काम मिळेल. चितोड रोडवरील 28 नंबर शाळेचा कायापालट होणार आहे. तेथे क्रीडा संकुल, व्यापारी संकुल आणि सुसज्ज शाळा उभारली जाणार आहे. या मागची संकल्पना बंटी मासुळेंचीच आहे.
योजनांची पुस्तिका घरोघरी पोहोचविणार : आ. अग्रवाल
आजपर्यंत आपण 10 हजार कामगांराना भांडीवाटप केली. सरकार गरिबांसाठी योजना तयार करते. मात्र, त्या जनतेपर्यंत पोहोचत नव्हत्या. यामुळे लवकरच सरकारी योजनांची पुस्तिका घरोघरी पोहोचविणार आहे. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अमोल मासुळेंसह भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले. यावेळी सुनील पाटील, गणेश गायकवाड, शाहीर गंभीर महाराज बोरसे, वाल्मीक जाधव, भगवान कुंभार यांनी मनोगत व्यक्त करत आमदार अग्रवाल, श्री. मासुळेंचे आभार मानले.

