जेसीबीच्या व्याज परताव्यासाठी 5 हजाराची लाच घेताना जिल्हा समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

0

 


जेसीबीच्या व्याज परताव्यासाठी 5 हजाराची लाच घेताना जिल्हा समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील लाचखोरी चव्हाट्यावर 

जन संघर्ष न्यूज 


धुळे :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत अनेक बेरोजगारांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत रोजगारासाठी कर्जवाटप करत असते. 

        सदर योजनेचे लाभार्थी तक्रारदार यांनी अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ, मर्या. मुंबई यांच्याकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जेसीबी घेण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून 24 लाख 96 हजार वैयक्तिक कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केले होते. 

         सदर घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या 18 हप्त्यांची मुदतीत परतफेड करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदार यांनी दिनांक 14 जुलै 2025 रोजी महामंडळाच्या धुळे येथील कार्यालयात जाऊन जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांची भेट घेतली असता त्यांनी कर्जाचा व्याज परतावा मिळण्यात साठी आवश्यक कागदपत्रे तक्रारदार यांच्याकडून जमा करून घेत, तक्रारदार यांचा व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिल्याशिवाय तुमचा प्रस्ताव पाठविणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या धुळे कार्यालयात जाऊन सदर घटनेची तक्रार केली होती.

           सदर तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 जुलै 2025 रोजी पंचासमक्ष सापळा रचून जिल्हा समन्वयक शुभम विका देव त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये नाचेची मागणी करून लाचेची रक्कम त्यांनी धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्त्यावर स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या लाचखोर जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये करण्यात आला आहे. 

           सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)