डॉ.बाबासाहेब आंबेडकर 88 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथे 31 जुलैला संदेश मेळावा
गगन मलिक फाउंडेशन तर्फे तथागत गौतम बुद्धांच्या शंभर मुर्त्यांचे होणार वाटप
जनसंघर्ष न्यूज
धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटीस यंदा 88 वर्ष पूर्ण होत आहेत. 31 जुलै 1937 रोजी त्यांनी वाघाडी (शिरपूर) येथील बैलपोळा प्रकरणासंदर्भात धुळे व शिरपूरमध्ये दौरा केला होता. त्यावेळी धुळे शहरात त्यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता ‘संदेशभूमी’ (ट्रॅव्हलर्स बंगलो) येथे संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कृती समिती प्रमुख आनंद सैंदाणे यांनी पत्र परिषदेत दिली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी सैंदाणे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते होणार असून, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून धम्मदूत गगन मलिक हे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार सुरू केला असून, ‘तथागत बुद्ध’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या मेळाव्याप्रसंगी गगन मलिक फाउंडेशनतर्फे तथागत बुद्धांच्या 84 हजार मूर्तींचे देशभर वाटप होणार आहे. मूर्ती मोफत असून, केवळ वाहतूक व शुल्क संबंधित खर्च भरावा लागेल. यासाठी संदेश भूमी येथे संपर्क साधावा, असेही आवाहन यावेळी सैंदाणे यांनी केले. ट्रॅव्हलर्स बंगलो (संदेशभूमी) या वास्तूचा समावेश ऐतिहासिक स्थळात व्हावा यासाठी संदेशभूमी संरक्षण कृती समितीने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला असून, अद्याप शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याला पूज्य भंते आनंद थेरो, भिक्कुनी आर्या शीलरक्षिता, आर्या वैशाली, भंते बोधिपाल, भंते धम्मानंद, भंते विनयप्रिय, भंते नागसेन, भिक्कुनी आया सुप्रिया या धम्मगुरूंचे आशीर्वाद लाभले असून विशेष अतिथी म्हणून ना.जयकुमार रावल, आ.अनिल पाटील, आ.अनुप अग्रवाल, आ.मंजुळा गावित, पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, प्रा.बाबा हातेकर, सिध्दार्थ बनसोडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात कवी भास्कर अमृतसागर, घनश्याम थोरात, शाहीर सुनिल थोरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमही होणार आहे. सर्व प्रबुद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संदेशभूमी संरक्षण समितीचे प्रमुख आनंद सैंदाणे व आयोजकांनी केले आहे.

