पक्षाच्या शिलेदारांसह धुळेकर दात्यांमुळेच महारक्तदान शिबिराचा महाविक्रम !

0


पक्षाच्या शिलेदारांसह धुळेकर दात्यांमुळेच महारक्तदान शिबिराचा महाविक्रम !

आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आयोजकांचा आमदार कार्यालयात सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

         धुळे, ता. २५ : राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात झालेल्या महारक्तदान शिबिरांतर्गत धुळे शहराने विक्रमी चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून महाविक्रम केला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनात पक्षाच्या शहरातील ३१ केंद्रांवरील आयोजकांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जितकी मोलाची, महत्त्वाची ठरली, तितकेच उल्लेखनीय योगदान हे सर्वसामान्य धुळेकर नागरिकांचे आहे. त्यांनी आपल्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रत्येक केंद्रावर सकाळपासूनच रांगा लावून रक्तदान केले. त्यामुळे आपण हा उच्चांक गाठू शकलो. यामुळे आयोजकांबरोबरच मी धुळेकर नागरिकांना शतशः नमन करून त्यांचे आभार मानतो, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.

येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात काल (ता. २४) सायंकाळी पक्षातर्फे झालेल्या महारक्तदान शिबिरात अमूल योगदान देणाऱ्या ३१ केंद्रांवरील आयोजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, महादेव परदेशी, बेटी बचाव अभियानाच्या संयोजिका अल्पा अग्रवाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, वैशाली शिरसाट, पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र शहा, यशवंत येवलेकर, नंदू  सोनार, चेतन मंडोरे, आकाश परदेशी, भिकन वराडे, वंदना भामरे, योगिता बागूल, कपिल शर्मा, दिनेश पारिख, पवन जाजू आदी व्यासपीठावर होते. 

पुढच्या वेळी आपणच आपला विक्रम मोडू

आमदार अग्रवाल म्हणाले, की महारक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची आणि ३१ केंद्रांवरील आयोजकांची  भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. टीममधील प्रत्येकाने शहरात रक्तदान उपक्रमाबाबत जनजागृती करत, घरोघरी भेटी देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रवृत्त केले, यामुळेच हा उपक्रम यशस्वी ठरला. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण एकाच दिवशी चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून जो उच्चांक प्रस्थापित केला ज्यामुळे हजारो रुग्णांना जीवदान मिळणार आहे. शहरात हा विक्रम कधीच कोणी मोडू शकणार नसले, तरी आपणच पुढच्या वेळी आपला हा विक्रम मागे टाकून नवीन उच्चांक स्थापन करू. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याने ठरवले तो कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकतो याची प्रचिती दाखवून दिली आहे. न भूतो न भविष्यती अशा या उपक्रमात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचे कुशल नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांना पदाधिकारी ओमप्रकाश खंडेलवाल, शेखर कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, पवन जाजू, सुनील कपिल, राम अग्रवाल, यशवंत येवलेकर आदी नियोजन समिती सदस्यांची मोलाची साथ लाभली. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. 

मुख्यमंत्र्यांप्रती दाखविलेले प्रेम अभूतपूर्व

डॉ. भामरे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या रक्तदानाच्या महायज्ञात शहरातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभागी होत या उपक्रम यशस्वीच करून दाखविला नाही, तर राज्यात सर्वाधिक रक्ताच्या बॉटल संकलन करून विक्रम नोंदविला. याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती आपण दाखविलेले प्रेम अभूतपूर्व ठरले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षांत शहरात अनेक विकासकामे झाली. त्यात निधी देण्यात सिंहाचा वाटा मुख्यमंत्र्यांचा राहिला. यामुळेच धुळेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी करून दाखविला.

आयोजकांचा सत्कार सन्मान वाढविणारा

हिरामण गवळी म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैला झालेला महारक्तदान शिबिरांतर्गत धुळे शहराने चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून केलेली कामगिरी राज्यात उच्चांकी ठरली. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमात शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जी अपार मेहनत घेतली त्यासाठी आपणा सर्वांचे शतशः आभार मानतो व अभिनंदन करतो. ही अपार मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आज आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व अल्पा अग्रवाल यांनी जो सत्काराचा उपक्रम घेतला तो प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान वाढविणारा आहे. 

कार्यकर्त्यांमुळेच प्रत्येक उपक्रम यशस्वी

श्री. अंपळकर म्हणाले, की लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात रेकॉर्डब्रेक रक्तसंकलनाचा उपक्रम झाला. यापूर्वी शहरात एकाच दिवशी चार हजारांहून अधिक बॉटल रक्तसंकलन कुणालाच जमले नाही, यापुढेही कोणाला जमणार नाही ते भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून दाखविले. हा क्षण प्रत्येक धुळेकराचा सन्मान वाढविणारा आहे. शहरातील ३१ केंद्रांवर ज्या आयोजकांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखविला त्यांचा सन्मान करण्याची कल्पना अल्पा अग्रवाल यांनी मांडली आणि आज हा सत्कार घडून येत आहे. या रक्तदानाच्या नियोजनात कल्पेश शर्मा यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या नियोजनातूनच हा उपक्रम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी करू शकलो, त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो. पक्षाने राज्यस्तरावरून दिलेला प्रत्येक कार्यक्रम-उपक्रम यशस्वी करण्यात आपण नेहमीच पहिल्या १० क्रमांकांमध्ये राहिलो आहोत आणि ते फक्त कार्यकर्त्यांच्या जिवावर. महारक्तदान शिबिराचा उपक्रमही आपण सर्वांनी यशस्वी करून दाखविल्याने आपणा सर्वांचे आभार मानतो.  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शिलेदारांचा गौरव

शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यात सर्व ३१ केंद्रांवरील आयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्यामुळेच आपण राज्यात सर्वाधिक चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करू शकलो. यामुळे या सर्व शिलेदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्याची कल्पना महानगर जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी मांडली. त्यावर आमदार अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व त्यांचा वेळ निश्चित करून नक्कीच हा गौरव केला जाईल, अशी ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)