धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे दर कडाडले

0



 
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे दर कडाडले

 जोरदार पावसामुळे भाजीपाला दरवाढीचा सामान्य जनतेला फटका 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे  :- संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला आहे. विशेषतः टमाट्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचा २० किलोचा कॅरेट ₹७५० ते ₹८०० दरम्यान विकला गेला.

        मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होण्याचे प्रमाण वाढले असून, बाजार समितीमध्ये आवक अत्यल्प झाल्याचे आढळून येते. याच कारणामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे दर वाढले आहेत.

        टमाट्याबरोबरच कांदा, बटाटा, कोथिंबीर, वांगी, मिरची यांसारख्या भाजीपाल्याच्या दरातही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात आडत दुकानदार हरीष गंगाधर माळी (धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती) यांनी माहिती देताना सांगितले की,

      "सध्या बाजारात टमाट्याची आवक अत्यंत कमी आहे. मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडत आहेत. येत्या काही दिवसांतही दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही."


दरवाढीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त असून, शेतकरी वर्गही पिकांचे नुकसान झाल्यामुळे अडचणीत आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)