जिद्द आणि मेहनतीने परिस्थिती बदलता येते – भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- "परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द आणि मेहनत असेल तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. शिक्षण हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा, शिक्षकांचे ऐका आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा," असे मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. गजेंद्र शेठ अंपळकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिवाजी मराठा बोर्डिंग स्कूल येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वही वाटप व प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन ललित गंगाधर माळी व हरीश गंगाधर माळी यांनी केले. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या या दोघा भावांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्या परंपरेतूनच हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर म्हणाले,
"माझं शिक्षण पहिली ते दहावी मराठीतून झालं. अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी घरची परिस्थिती नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली केली. त्यातून शिक्षण पूर्ण केलं आणि जीवनात प्रगती केली. आज मी जिथे आहे ते केवळ जिद्द आणि मेहनतीमुळे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. इंग्रजीसारख्या विषयाचे महत्त्व लक्षात घेत ते आत्मसात करा, कारण भविष्यात त्याचा उपयोग होतो. शिक्षणामुळेच आपण मोठ्या पदावर पोहोचतो."
ललित माळी व हरीश माळी यांनी समाजासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, अशा उपक्रमातून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षात सक्रिय असून त्यांच्या कार्याची जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी यावेळी विशेष प्रशंसा केली.
या कार्यक्रमाला मराठा संस्थेचे चेअरमन मा. संदीप पाटील, मा. नगरसेवक देविदास लोणारी, मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील, पेठ विभाग अध्यक्ष पंकज धात्रक, भाजपा सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू, संदीप केने,सुहास अंपळकर, मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर, धनंजय पाटील, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती दीपाली चौधरी यांनी केली.सूत्रसंचालन सौ हर्षदा पाटील यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले.तर आभार प्रदर्शन संस्थेचे मुख्याध्यापक डी. सी. महाले सर यांनी मानले.

