धुळे महानगरपालिकेत कोट्यावधींचा मालमत्ता कर घोटाळा
मालमत्ता करांच्या आकारणीमध्ये सावळा गोंधळ
वाढिव बिलांची होळी करत शिवसेना उबाठा वतीने आयुक्तांना घेराव
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- धुळे महानगरात मालमत्ता करांच्या अवाढव्य बिलांमुळे पुन्हा एकदा असंतोष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळे ही ड वर्ग महानगर पालिका आहे. मात्र मालमत्ता कर हा अ वर्ग महानगर पालिकेपेक्षा अधिक आकारला जातो. हा सार्वत्रिक आरोप होत आहे. मनपाचा पूर्वीचा दर हा 26 टक्के होता. तो भयानक पणे वाढवून 36 टक्के करण्यात आला होता. त्यावर प्रचंड वादळ उठले. त्यानंतर तो 36 वरून 30 टक्के करण्यात आला. जर नवीवाढ चार टक्के आहे तर ही चार टक्के वाढ व जुन्या प्रॉपर्ट्यांचा घसारा वजा जाता नवीन बिले पूर्वी इतकी किंवा किंचित वाढीची यायला हवी होती. मात्र काहींना चक्क दुप्पट-तिप्पट बिले कशी काय येत आहेत?
एप्रिल 2025 मध्ये 25-26 या वर्षाकरीता मालमत्ताकराची बिले धुळे मनपाच्या वतीने नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाच्या डोक्यात परत भ्रष्टाचाराचा किडा वळवळला आणि जून 2025 मध्ये परत नव्याने मालमत्ता कराची बिले धुळेकरांना आकारण्यात आली. एप्रिल व जूनच्या बिलामध्ये प्रचंड तफावत असून अव्वाच्या सव्वा बिले या ठिकाणी लावण्यात आलेली असून प्रॉपर्टी मोजमापाच्या आधारे इतर 14-15 करांच्या आकारणीची टक्केवारी ठरत असतांना ही बिले कोणत्या आधारे आकारण्यात आली हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून धुळे शहरातील मालमत्तांच्या फेरमोजणीच्या आदेश प्राप्त करुन घेतले. या आधी विधानसभेच्या निवडणूकांपूर्वी तत्काल
तत्कालीन नगर सचिव गोविंद राजन यांच्याकडून या वाढीव मालमत्ता कराला स्थगिती देण्यासंदर्भात आदेश पारीत करुन घेतले होते. या आदेशाला धुळे मनपाच्या प्रशासनाने केराची टोपली दाखवत मनमानी पध्दतीने आकारणी व वसुली सुरुच ठेवली आहे.
धुळे महानगरपालिकेने मालमत्तांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण पून: मुल्यांकनाचे काम स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि. अमरावती यांना कोट्यावधी रु. देऊन दिले. सदर कंपनीने डिजीटल तंत्रज्ञान वापरुन अव्वाच्या सव्वा मालमत्तेची मोजणी केली. या कंपनीकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार संपूर्ण मालमत्तांचे जीआयएस आधारीत प्रत्यक्ष सहसर्वेक्षण करुन युनिक प्रॉपर्टी ऑथोरीटी कोड नोंदणीवही तयार करणे, मुल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण, अद्यावत संगणकीकृत नकाशे काढणे वार्डनिहाय मालमत्ताचे डिजीटल फोटो काढणे, संगणकीकृत नकाशे फोटो डेटावरुन जोडणे, झोन प्रमाणे नकाशा तयार करुन ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणाली द्वारा सुधारीत मुल्यांकन करुन घेणे गरजेचे होते. पण संबंधीत कंपनीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन अवाजवी पध्दतीने मोजमाप करुन घेतले. गेल्या वर्षी मालमत्ता करामध्ये वाढ केल्यानंतर धुळे शहरातील वाढीव गावांमधील मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतर शहरातील भागांना टप्प्याटप्याने कर आकारणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या. या करांमध्ये तफावत आढळल्याने नागरिकांच्या हरकती मागवून मनपा वतीने सुनावणी करण्यात येऊन देखील नागरिकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही.
एकत्रित मालमत्ता कराचा विचार केल्यास पनवेल, अहमदनगर, जळगांव, अमरावती, छ.संभाजी नगर, अकोला, मालेगांव या शहरात धुळ्यापेक्षा कमी एकत्रित मालमत्ता कर आकारला जातो. एकत्रित मालमत्ता करावर जे विविध कर विशेष शिक्षण, वृक्ष संवर्धन, अग्निशमन, जललाभ, दिवाबत्ती, मलनिस्सरण, पथकर, साफसफाई, घनकचरा सेवा, मनपा शिक्षण उपक्रम, सिव्हरेज कर, लावले जातात. या करांमध्ये इतर महानगरपालिकांमध्ये कुठे एक तर कुठे अर्धा टक्का अशी आकारणी केल्यामुळे इतर महानगरपालिकांचा कर हा धुळे मनपाच्या करापेक्षा कमी येतो. धुळे महानगरपालिकेत 2008 साली जळीत कांड झाल्यानंतर सर्व मालमत्ता धारकांचे रेकॉर्ड जाळण्यात आले. तद्नंतर धुळे महानगरपालिका मालमत्ता कराची वसुली ही कुठल्याही नियमांची अंमलबजावणी न करता होत राहिली. अनेक मालमत्ता करांचे रेकॉर्ड उपलब्ध नसतांना सुध्दा ही आकारणी मालमत्ता कर विभाग करीत राहिला. नवीन सर्वेक्षणाच्या आधारे धुळे महानगरपालिकेत जवळपास 40 ते 50 हजार मालमत्ता धारक नव्याने अचानक आढळून आले. या 40-50 हजार मालमत्ता गेल्या 15 ते 20 वर्षांपासून तयार झाल्या असून या मालमत्ता धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या नजरेस का आल्या नाहीत. या मालमत्तांना इतके वर्ष अभय राजकारण्यांनी दिले की, महानगरपालिका प्रशासनातील वसुली विभागातील अधिकार्यांनी हा मोठा प्रश्न असून या आधी आकारण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये वसुली विभागातील प्रशासनाने प्रचंड भ्रष्टाचार केलेला असून त्याचे व्यवस्थित खोदकाम केल्यास हा आकडा कोट्यावधींमध्ये जाऊ शकतो.
मोजमाप ठेकेदाराने चुकीच्या पध्दतीने मालमत्तेचे मोजमाप केल्याची कबुली मनपा अधिकार्यांनी याआधीच दिली असून अमरावतीतील या ठेकेदारावर मनपामधील कुणाकुणाचे नियंत्रण होते ? त्यांनी काय कर्तव्य बजावले ? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
या ठेकेदाराला चुकीच्या पध्दतीने वसुली विभागातील अधिकार्यांनी चुकीचा डेटा देखील जाणून बुजून देण्यात आल्याने या ठेकेदांराची कार्यपध्दती बदलविण्यामागे वसुली विभागातील अधिकार्यांचा मोठा हात असल्याचे दिसून येत आहे.
धुळे मनपाने एप्रिल ते जून या कालावधीत नागरिकांकडून 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर 21 हजार मालमत्ता धारकांकडून भरण्यात आला. त्या मालमत्ता धारकांच्या बिलांमधील तफावत कशी कमी करणार ? व त्यांनी भरलेला अधिकचा मालमत्ता कर कसा परत करणार हा देखील महत्वाचा प्रश्न असून नगरविकास राज्यमंत्र्यांकडून आलेल्या आदेशानुसार सन 2025-26 साठी धुळे मनपाने बनविलेली व वाटलेली मालमत्ता करावी सर्व 100% बिले आधी रद्द करण्याची घोषणा धुळे मनपा प्रशासनाने करावी व त्यानंतरच सर्व मालमत्तांचे पुन:मोजणी करावी. धुळे महानगरपालिकेने सद्यस्थितीत जुन्या पध्दतीने म्हणजेच 26% देखील मालमत्ता कराची आकारणी केल्यास धुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात चांगल्या पध्दतीची वाढ होऊ शकते. पण धुळे महानगरपालिका वाढीव मालमत्ता कराच्या टक्केवारी मागे लागल्याने नागरिकांमध्ये असंतोष तर आहेच, पण धुळेकरांची मानसिकता पाहता येणार्या काही वर्षांत धुळेकर नागरिक हा कर भरणारच नाहीत हे देखील मनपा प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे धुळे मनपाने एप्रिल व जून महिन्यात नागरिकांना दिलेली सर्व वाढीव मालमत्ता कराची बिले रद्द करण्याची घोषणा करावी व त्यानंतर संपूर्ण धुळे शहरातील मालमत्ता करांचे प्रभागनिहाय किंवा झोन निहाय पुन:मोजणी करुन त्यांचे अद्यावत रेकॉर्ड तयार करुन मगच इतर उपकरांची टक्केवारी आकारुन नागरिकांना मालमत्ताकरामध्ये दिलासा द्यावा , अशी मागणी करत शिवसेना वतीने आयुक्तांना घेराव टाकून महानगरपालिकेने जून महिन्यात दिलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या मुलांची महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ होळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ,उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी,निंबा मराठे, सुनील पाटील, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, दिनेश पाटील, विकास शिंगाडे, , संदीप चौधरी, संजय पाटील, नितीन देशमुख, सागर निकम ,सागर साळवे, नासिर पिंजारी, वैभव पाटील, हर्षल वाणी, राजू पाटील, चांद मिस्तरी, रविंद्र गावडे, जगदीश शिंदे, अमोल ठाकूर , अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

