मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात महान रक्तदान शिबिर
महारक्तदान शिबिरात उद्या ३००० हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट
आमदार अग्रवाल : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ३१ ठिकाणी उपक्रम
जनसंघर्ष न्यूज
धुळे, ता. २१ : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलैला असलेल्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी (ता. २२) शहरातील विविध भागांतील ३१ ठिकाणी महारक्तदान शिबिर होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून शहरातून सुमारे ३००० ते ४००० बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असून, या शिबिरात धुळेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या श्रेष्ठ कर्तव्यात योगदान द्यावे, असे आवाहन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी होत असलेल्या रक्तदान महाशिबिराच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज सकाळी मालेगाव रोडवरील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली, तीत आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, जितेंद्र शहा, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी नगरसेविका भारती माळी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, पवन जाजू, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, पृथ्वीराज पाटील, मोहिनी गौड आदी उपस्थित होते.
आमदार अग्रवाल म्हणाले, की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा उपक्रम होत आहे. त्यानुसार धुळे शहरातही विविध भागांतील ३१ ठिकाणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मी व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात महारक्तदान शिबिर होईल. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून, शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना खास गिफ्टही देण्यात येणार आहे. या शिबिरात शहरातील तरुणाईसह धुळेकरांनी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी रक्तदान करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.
श्री. अंपळकर म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या होत असलेल्या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी करून घेण्यात येत आहे. यातून सुमारे तीन हजार बॉटल रक्तसंकलनाचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. राज्यात सर्वाधिक बाटल्या रक्तसंकलन करून लोकसंख्येच्या मानानुसार धुळे शहर पहिल्या क्रमांकावर कसे राहील यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने हा उपक्रम यशस्वी करतील.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली मदत
या पत्रकार परिषदेत आमदार अग्रवाल यांनी शहरातील दात्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतः एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची घोषणा केली. भाजपचे पदाधिकारी जितेंद्र शहा यांनीही पत्रकार परिषदेतच दोन लाख रुपयांचा धनादेश आमदार अग्रवाल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. पत्रकार बांधवांतर्फे व्यंगनगरीचे संपादक तथा ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र सोनार यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार अग्रवाल यांच्याकडे दोन हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन हजार रुपयांचा धनादेश आमदार अनुप अग्रवाल यांना देताना व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार. शेजारी गजेंद्र अंपळकर, मनोज गर्दे, जितेंद्र शहा, प्रदीप कर्पे, ओमप्रकाश खंडेलवाल, डॉ. सुशील महाजन.


