धुळे शहरात सोलर सेल उत्पादन प्रकल्प सुरू होणार -आमदार अनुप अग्रवाल

0

  


धुळ्यात तब्बल चार हजार कोटींच्या सोलर सेलच्या गुंतवणुकीस उद्योजक तयार


आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने मुंबईत पालकमंत्री-उद्योजकांची चर्चा

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. १ : धुळे शहर परिसरात सोलर पॅनल निर्मितीसाठी लागणाऱ्या सोलर सेल उत्पादन प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास गुजरातमधील उद्योजक उत्सुक व सकारात्मक आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात बैठक झाली. तीत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, ऑरा सोलर लिमिटेडचे डायरेक्टर तथा उद्योजक अभिषेक जगनानी व रिखिल अग्रवाल व आमदार अग्रवाल उपस्थित होते. 

दरम्यान, बैठकीत उद्योगासाठी शासनाकडून हव्या असणाऱ्या सोयी-सवलतींसह मदत व सहकार्याबाबत चर्चा झाली. पालकमंत्री रावल यांनी उद्योगासाठी आवश्यक त्या सर्व सहकार्याची ग्वाही दिली.

भारतात उत्पादित सोलर पॅनलमध्ये आतापर्यंत विदेशात उत्पादित सेल वापरले जात होते. मात्र, आता केंद्र सरकारने या सेलचे अधिकाधिक उत्पादन भारतीय कंपन्यांकडून व्हावे, यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसार सोलर पॅनल सेल उत्पादन करण्याचा प्रकल्प धुळे शहरासह परिसरात सुरू करण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल आग्रही असून, त्या दृष्टीने काही उद्योजकांकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. गुजरातमधील उद्योजक तथा ऑरा सोलर लिमिटेडचे डायरेक्टर अभिषेक जगनानी व रिखिल अग्रवाल यांची भेट घेतली असता त्यांनी सोलर सेल उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास उत्सुकता दाखविली. या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी उद्योजक जगनानी व अग्रवाल यांच्यासह पालकमंत्री जयकुमार रावल यांची नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेत चर्चा केली. 

एक हजारावर युवकांना रोजगार

पालकमंत्री रावल यांनी धुळे शहर परिसरात सोलर सेलचे उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्याचे, सोयी-सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. उद्योगाला आवश्यक ग्रीन टेबल उपलब्ध करून देण्याची ग्वाही देताना पालकमंत्री रावल यांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. यावर उद्योजक श्री. जगनानी, श्री. अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भविष्यात हा उद्योग सुरू झाल्यास धुळे जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी मिळणार आहे.

वस्रोद्योग उभारणीसाठी सहकार्याचे आश्वासन

धुळ्यासह खान्देशात होत असलेल्या कापसाच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल धुळे शहर परिसरात वस्रोद्योग उभारणीसाठी पाठपुरावा करत आहेत. काही महिन्यांपूर्वी धुळ्यात झालेल्या उद्योग गुंतवणूक परिषदेत गुजरातमधील काही उद्योजक सहभागी झाले होते. या परिषदेत १२०० कोटी रुपये गुंतवणुकीतून धुळ्यात टेक्स्टाइल पार्क सुरू करण्याबाबत या उद्योजकांशी सामंजस्य करारही झाला आहे. या उद्योगांना शासनाकडून स्थानिक स्तरावर लागणारी मदत व सहकार्य करण्याबाबत चर्चेसाठी आमदार अग्रवाल यांच्या पुढाकाराने संबंधित उद्योजकांची बैठकही पालकमंत्री रावल यांच्यासोबत झाली. बैठकीत पालकमंत्री रावल यांनी धुळ्यात वस्रोद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले. शासनाकडे यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही दिली.

उद्योगांना सवलती देण्याची गरज : आमदार अग्रवाल

आमदार अग्रवाल यांनी सांगितले, की शासनाच्या सामूहिक प्रोत्साहन योजना-२०१९ मध्ये धुळे जिल्ह्याला ड प्लसपेक्षा अधिक सवलती मिळत आहेत. यात आकांक्षी जिल्हा (एक्स्पारेशन डिस्ट्रिक्ट) म्हणून धुळे जिल्ह्याला घोषित करण्यात यावे व १२० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक अनुदान, भांडवली अनुदान मिळावे, जीएसटीत सवलत मिळावी, वीजदरात सवलत मिळावी आदी मागण्या यापूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या  बैठकीतही या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. त्याबाबत आपण पुढाकार घेऊन या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी पालकमंत्री रावल यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांकडे पाठपुराव्याची ग्वाही पालकमंत्री रावल यांनी आमदार अग्रवाल व उद्योगकांना देतानाच आमदार अग्रवाल यांच्याकडून उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)