पाचकंदीलच्या चारही मार्केटचे लवकरात लवकर नूतनीकरण

0

 

धुळे : शहरातील पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या मार्केटची पाहणी करताना आमदार अनुप अग्रवाल, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महादेव परदेशी, आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे, मनपाचे उपअभियंता चंद्रकांत उगले, ॲड. रोहित चांदोडे, विकी परदेशी, किशोर चौधरी आदी.


पाचकंदीलच्या चारही मार्केटचे लवकरात लवकर होणार नूतनीकरण 

आमदार अनुप अग्रवाल यांनी मनपा आयुक्तांसह केली पाहणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. २३ : शहरातील ऐतिहासिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सद्यःस्थितीत दुरवस्था झालेल्या पाचकंदील परिसरातील महापालिका मालकीच्या चारही मार्केटचे लवकरात लवकर नूतनीकरण केले जाईल. त्यासाठी आराखडा, अंदाजपत्रक बनविण्यासह तांत्रिक बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातून व्यापारी व नागरिकांसाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.

शहरातील पाचकंदील ते महात्मा गांधी पुतळादरम्यान महापालिकेने नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे. त्यामुळे जुन्या आग्रा रोडवर व्यवसाय करणाऱ्या सर्वच विक्रेत्यांना या मुख्य रस्त्यावरून हटविण्यात आले आहे. या विक्रेत्यांसह पाचकंदीलमधील विविध व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पाचकंदीलमधील महापालिकेच्या चारही मार्केटचे नूतनीकरण करण्याचा निर्णय आमदार अग्रवाल यांच्यासह महापालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार अग्रवाल यांनी चारही मार्केटची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त  अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे, मनपाचे उपअभियंता चंद्रकांत उगले, ॲड. रोहित चांदोडे, विकी परदेशी, किशोर चौधरी आदी उपस्थित होते. 

आमदार अग्रवाल यांच्या पुढाकाराने महापालिकेने मार्केटच्या नव्या आराखड्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. या कामासाठी आवश्यक असलेला नकाशा, आराखडा तसेच अंदाजपत्रक तयार करून तातडीने महापालिकेकडे पाठविण्याच्या सूचना आमदार अग्रवाल यांनी आर्किटेक्टना दिल्या. या चारही मार्केटमध्ये शहरातील विविध भागांत रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांना आधुनिक पद्धतीने शेड, ओटे आदी सुविधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यातून शहरातील विविध ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध होऊन व्यापारास चालना मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.

आमदार अग्रवाल यांनी चारही मार्केटची पाहणी करताना मार्केटमधील व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी लवकरच नूतनीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे आश्वासन आमदार अग्रवाल यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)