लोजपा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीसोबत लढणार- प्रमोद कुदळे
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- लोक जनशक्ती पार्टीने (राम विलास) संपुर्ण राज्यात मोठे संघटन उभे केले आहे. विविध राज्यांमध्ये आमचे आमदार, खासदार निवडून आलेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूकीत लोजपाचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहीले. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत लोजपा एनडीएसोबत असून महायुतीतील मित्र पक्षाने लोजपाला मानाचे स्थान दिले पाहीजे. तसेच दलित समाजाचा निधी इतरत्र वळवु नये. अन्यथा रस्त्यावरही उतरू, असा इशाराही लोजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी पत्रपरिषदेत दिला.
साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष कुदळे यांच्यासह प्रदेशमहासचिव डॉ. अशोक गायकवाड, राजेश छाजेड, राहुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष दिलीपआप्पा साळवे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, प्रमोद सोनवणे, सागर धिवरे, कल्याण गरूड आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष कुदळे यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यातंर्गत उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे आज दि.25 ऑगस्ट रोजी धुळे शहरातील रचना हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध पक्षातील पदाधिकार्यांचा प्रवेश व नियुक्त्या होणार असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत दिशा दिली जाणार आहे. लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) हा राष्ट्रीय स्तरावर सक्रिय पक्ष असून बिहारमध्ये पाच खासदार, नागालँडमध्ये दोन आमदार, राजस्थान व झारखंडमध्येही आमदार निवडून आलेले आहेत. पक्षाचे संस्थापक पद्मभूषण रामविलास पासवान यांनी केंद्रीय मंत्रीपदावर काम करताना मोफत धान्य वितरण, शेतकर्यांसाठी खत योजना, मंडल आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत पक्ष आज देशभर विस्तारत आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संघटन विस्ताराला गती मिळाली असून विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रात आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना महायुतीसोबत लढविण्याची पक्षाने भूमिका घेतली आहे. तसेच धुळे रेल्वे स्थानकातून पुणे-कोल्हापूर व दक्षिण भारतासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासाठी पक्षाचे केंद्रीयमंत्री चिराग पासवान हे रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यार असल्याचेही कुदळे यांनी सांगितले.

