शहर पोलीस वाहतूक शाखेचे पी.आय. ज्ञानेश्वर वारेंची बदली रद्द करा !

0

     


 शहर पोलीस वाहतूक शाखेचे पी.आय. ज्ञानेश्वर वारेंची बदली रद्द करा !

महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची मागणी !

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री. ज्ञानेश्वर वारे यांची तीन महिन्यात तडकाफडकी झालेली बदली त्वरित रद्द करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्त करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री कैलास हजारे यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख श्री श्रीकांत धिवरे साहेब यांना भेटून केली. 

        धुळे जिल्हा पोलीस प्रमुख श्री श्रीकांत धिवरे यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले की, धुळे शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे साहेब हे वाहतूक शाखेत रुजू झाल्यापासून त्यांनी या शहरातील कोलमडलेल्या वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. शहरातील बंद पडलेले सिग्नल कार्यान्वीत केले.तसेच मुख्य बाजार पेठ असलेला आग्रारोड व दत्त मंदिर ते नगावबारी हा रस्ता फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढून वाहतुकीसाठी मोकळा केला.वारे साहेबांची बदली झाल्यानंतर आग्रारोड आणि गांधी पुतळा ते दत्त मंदिर ते नगावबारी या रस्त्यावर पुन्हा खाद्य पदार्थाच्या गाड्या आणि  भाजीवाल्यांनी अतिक्रम केले आहे, ते हटवण्याची जबाबदारी आता तुम्हीच घेतली पाहिजे. 

           शहरात कोलमडलेली वाहतूक सुरळीत व्हायला लागली होती. पाच कंदील परिसरात काही मुजोर फेरीवाल्यांकडून शहरातील माय-माऊल्याना होणाऱ्या अपमानास्पद शेरेबाजीला तोंड द्यावे लागत होते.त्यातून त्यांची सुटका झाली होती. आग्रारोडच्या दुकानदारांना या फेरीवाल्यांचा त्रास होता. हेच मुजोर फळ विक्रेते वाहन धारकांना दादागिरी करून मारहाण करीत होते. त्यामुळे दंगल होण्याचा धोका निर्माण झाला होता. या सर्व त्रासातून वारे साहेबांनी नागरिकांची मुक्तता केली होती. बऱ्याच वर्षानंतर एक चांगले काम करणारा अधिकारी शहरात नियुक्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु त्यांची दोन-तीन महिन्यात बदली केली हे चुकीचे झाले.चांगले आणि लोकहिताचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्यामागे मागे जनतेने आणि प्रशासनाने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. वारे साहेब जनहिताचे चांगले काम करीत होते म्हणून त्यांची बदली करण्यात आली, चांगल्या कामाचे बक्षिस त्यांना मिळाले असा समज येथील जनतेमध्ये निर्माण झाला आहे. तो दूर होणे गरजेचे आहे, नाहीतर कोणताही अधिकारी या शहरात चांगले लोकोपयोगी काम करण्यास धजवणार नाही. याची कृपया आपण नोंद घ्यावी.   

          आपणास या पत्राद्वारे तमाम धुळे शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येते की, धुळे शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्त करावे अशी मागणी सर्वश्री कैलास हजारे,रमेश पोतदार,दिलीप उपाध्ये,संजय बगदे,चंद्रकांत येशीराव,मिल्लिंद सोनवणे,राजीव सोनवणे, अशोक तोटे, घननीळ साळुंके,राजेंद्र भामरे,संदीप शेवतकर,बिपीन अमृतकर, अमितकुमार बडगुजर,भगवान वाघ,सुधीर लिमये, सचिन सोनवणे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)