एबी फाउंडेशन, ॲक्वा वॉटर मित्र परिवारातर्फे साक्री रोडवरील सिंहस्थनगरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0


 एबी फाउंडेशन, ॲक्वा वॉटर मित्र परिवारातर्फे साक्री रोडवरील सिंहस्थनगरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 

शिबिरात आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी.


एबी फाउंडेशनची जात-पात न पाहता मानवतेतून वैद्यकीय सेवा : आमदार अग्रवाल

साक्री रोडवरील मोफत शिबिरामध्ये पाच हजारांवर नागरिकांची आरोग्य तपासणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. 28 : एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मानवतेच्या दृष्टिकोनातून गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून वैद्यकीय सेवा दिली जात आहे. यामध्ये कुठलीही जात-पात न पाहता गोरगरीब रुग्णांना विविध शिबिरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणीसह उपचार, शस्रक्रिया, रक्त तपासणी आदी सेवा दिल्या जात आहेत. तसेच पुण्या-मुंबईतील मोठ्या रुग्णालयांमध्ये विविध आजारांवर आवश्यक ते उपचार तसेच शस्रक्रियांसाठी शासनाच्या विविध योजनांतून मदत, सहकार्य केले जात आहे. ही आरोग्य सेवा जनसेवाच नव्हे, तर ईश्वरसेवा आहे. यामध्ये जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याची माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.

येथील साक्री रोडवरील जे. के. ठाकरे हॉस्पिटलजवळील सिंहस्थनगरमध्ये नुकतेच एबी फाउंडेशन व ॲक्वा वॉटर मित्र परिवारातर्फे श्री गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले, त्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अग्रवाल बोलत होते. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, समाधान शेलार, महादेव परदेशी, माजी नगरसेवक अमोल मासुळे, संजय जाधव, बन्सी जाधव, दादा खताळ, संतोष खताळ, रावसाहेब नांद्रे, राकेश कुलेवार, प्रशांत बागूल, किरण जोंधळे, एन. डी. पाटील, राजेंद्र इंगळे, अशोक सुडके, मुन्ना शितोळे, भाजप महिला आघाडीच्या वैशाली शिरसाट, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, मंगला पाटील, योगिता बागूल आदी उपस्थित होते. 

आमदार अग्रवाल म्हणाले, की आठ-नऊ महिन्यांपूर्वी `तुमचे आरोग्य- आमचे प्राधान्य’ या उद्देशाने प्रत्येक गरजूपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने एबी फाउंडेशनची स्थापना झाली. त्याद्वारे शहरातील विविध भागांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन विविध आजारांवर गरजूंची मोफत तपासणी, रक्त तपासणीसह शस्रक्रियाही केल्या जात आहेत. गंभीर आजारांच्या अनेक गरजू रुग्णांना पुण्या-मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत वैद्यकीय सेवा मिळावी, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठीही फाउंडेशनतर्फे पाठपुरावा केला जात आहे. यातून आतापर्यंत हजारो रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. 

शिबिराचे संयोजक समाधान शेलार यांनी पुढाकार घेत आपल्या परिसरात जनसेवेचे हे कार्य सुरू केले त्याबद्दल आमदार अग्रवाल यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, की शेलार सरांच्या या चांगल्या कार्याची परिसरातील नागरिक नक्कीच दखल घेतील. श्री. शेलार व एबी फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांनी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या शिबिराबाबत माहिती दिली. 

विविध आजारांच्या तपासण्या- उपचार

शिबिरात 4400 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली. यातील 153 जणांवर विविध शस्रक्रिया होतील. 333 रुग्णांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली. त्यांना संदर्भीय सेवेचा सल्ला देण्यात आला. 1800 नागरिकांची नेत्र तपासणी करून 180 नागरिकांना चष्म्यांचे मोफत वाटप झाले. 700 नागरिकांची त्वचारोग तपासणी झाली. 210 नागरिकांची दंत तपासणी करून उपचार करण्यात आले. 160 नागरिकांची किडनी संसर्ग तपासणी, 299 जणांची मायग्रेन तपासणी, 1300 नागरिकांची हृदय तपासणी, 90 बालकांची प्राथमिक तपासणी, 993 नागरिकांच्या रक्त तपासण्या, 1500 नागरिकांची हाडांची तपासणी, 588 नागरिकांची आयुर्वेद तपासणी व औषधोपचार करण्यात आले. 110 नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यात आला. गरजू रुग्णांना विविध आजारांवरील औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)