पीएसआय महादेव गुट्टे यांची अभिमानास्पद कामगिरी ; वयोवृध्द महिलेचे हरवलेले दोन तोळ सोन्याचे दागिने शोधून केले परत
अजूनही महादेव गुट्टे सारखे प्रामाणिक पोलिस अधिकारी कार्यरत आहेत !
श्रीरामपूर वरुन भगवानगड येथे दर्शनासाठी चाललेल्या वयोवृद्ध महिलेचे हरवलेले सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिने,कपडे व कागदपत्र असलेली पिशवी पाथर्डी पोलिसांनी शोध घेऊन तालुक्यातील एका खेडेगावातील दुसऱ्या महीलेकडुन हस्तगत करुन सुभद्रा शंकर डोंगरे (वय अंदाजे ८०) या महिलेस ते परत देण्यात आले.विशेष म्हणजे या विषयी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नव्हती परंतु गुप्त माहितगाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे शोध घेत ही पिशवी हस्तगत करुन त्यातील ऐवजाची खातरजमा करून तो ऐवज त्यांना परत करण्यात आल्यामुळे पाथर्डी पोलिसांची कार्यतत्परता व कर्तव्यदक्षत या गुणांचे कौतुक केले जात आहे.
सुभद्रा डोंगरे या वयोवृद्ध आजी सध्या श्रीरामपूर येथे राहतात.त्या भगवान बाबां व मोहटादेवी येथे दर्शनासाठी नियमित येत असतात.मुळ त्या याच भागातील असल्याने त्यांचे हे दोन्ही ठिकाण श्रद्धास्थान आहेत.मागील आठवड्यात ५ ऑगस्ट रोजी त्या भगवानगडावर जात असताना त्यांची सोन्याची दागिने साधा मोबाईल व कपडे कागदपत्र असलेली पिशवी गहाळ झाली.त्याच प्रवासा दरम्यान दुसऱ्या महीलेला ती पिशवी सापडली.दरम्यान आजीने पिशवी गहाळ झाल्याने भांबावलेल्या अवस्थेत व रडवलेल्या सुरात मोहटादेवीला साकडे घातले होते.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांना एका गुप्त माहीतीगाराकडुन माहीती मिळाली की एका गावात एका महीलेला सोन्याचा ऐवज असलेली पिशवी सापडली आहे त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी कार्य तत्परता दाखवत पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत,इजाज सय्यद व महीला पोलीस कर्मचारी धाणे मॅडम यांना याबाबत मार्गदर्शक सूचना करून ती पिशवी त्या महीलेकडुन हस्तगत केली.त्या पिशवीतील आधार कार्ड व मोबाईल वरील नंबर वरून श्रीरामपूर येथील पोलीस स्टेशनचे कर्मचारी टेकाळे यांच्याशी संपर्क करून भगवान शंकर डोंगरे व त्या वृद्ध महिलेचा शोध घेण्यात आला व तुमची सोन्याचे दागिने असलेली पिशवी मिळुन आल्याचे सांगण्यात येऊन ते तुम्ही घेऊन जा असे सांगण्यात आले.यानंतर त्या वृद्ध माता पाथर्डी पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्वांच्या समक्ष त्यांची पिशवी व दागिने त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.त्यावेळी त्या वृद्ध मातेच्या चेहऱ्यावर समाधान व कृतज्ञतेचे भाव होते.आई जगदंबा मोहटादेवीची कृपा तिनेच ह्या इमानदार पोलिसांना पाठवले व माझा ऐवज मला परत मिळाला.जगात अजुनही माणुसकी व चांगले लोक आहेत असे वृद्ध माता सुभद्राबाई डोंगरे यांनी यावेळी सांगितले..!

