मानसिक छळ करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूषण शिरसाट व विशाल साळुंखे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदान करणार :-
एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी विनायक दामोदर चौधरी यांच्या इशारा
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- सेवानिवृत्तीच्या वर्षभराच्या आधीपासून आणि निवृत्तीनंतर देखील आर्थिक, मानिसकरित्या छळणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूषण शिरसाठ आणि विशाल साळूंखे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करेल असा इशारा एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी विनायक दामोदर चौधरी यांनी दिला आहे.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनायक चौधरी म्हणाले की, दि.३० एप्रिल २०२५ रोजी एसटी महामंडळातील लिपिक पदावरुन नियत वयोमानानुसार मी सेवानिवृत्त झालो. ३७ वर्ष ४ महिने सेवा केली असून या काळात कामकाज व्यवस्थीतरित्या पूूर्ण केले. परंतु निवृत्ती आधी आणि निवृत्तीनंतर महामंडळातील काहींनी माझा झळ केला असा आरोप चौधरींचा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दि.१२/०९/२०२३ रोजी कोणताही कर्मचारी कमी झालेला नसताना प्रवास भत्ता बिलाची कामे आणि इतर कामे मला वाढदिण्यात आली. दि.१३/०५/२०२४ रोजी पुन्हा सुडबुध्दीने हेतुपुरस्कर काम वाढविण्यात आले. ती कामे मी केलीच. ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी पुन्हा सुडबुध्दीने न लागणारी माहिती, प्रवास भत्ता बिलाविषयी १ वर्षाची माहिती काढण्यास सांगितली. ही माहिती एका दिवसात पाहिजे असे म्हणत माझ्याशी वाद घातला.त्यानंतर मी ५५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर असताना माझ्याविरुध्द खोटी एकतर्फी चौकशी करुन वरिष्ठ लिपिक योगेश भोई यांनी मोबाईलवर संक्षीप्त आरोपपत्र पाठविले आणि दोन दिवसात उत्तर द्यावे असे व्हाट्सअॅपद्वारे कळविले. आजारी असल्याने या आरोपपत्राचा खुलासा करु शकलो नाही. मला बचावाची संधी न देता ६ हजार २२२ रुपये माझ्या पगारातून वसुल करण्यात आले. या बाबत विभागनियंत्रकाकडे तक्रार आणि अपिल केले. परंतु ते फेटाळण्यात आले. या त्रासामुळे माझी प्रकृती खराब होवू लागली. मला वारंवार रजा घ्यावी लागली. या रजेमुळे ३ लाखांचे आर्थिक नुकसान झाले. दि.१४ ऑक्टोंबर २०२४ रोजी विभाग नियंत्रकांना पुराव्यानिशी भूषण शिरसाठ, विशाल साळूंखे यांच्याकडून होणार्या त्रासाबाबत तक्रार केली. परंतु २४ मार्च २०२५ ला तक्रारी अर्जात तथ्य नसल्याने हा अर्ज चौकशी अंती दप्तरी दाखल करण्यात आल्याचे सांगितले. या छळाबाबत मुंबईचे परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक सुरक्षा दक्षता अधिकारी, कामगार अधिकारी, धुळ्याचे विभाग नियंत्रक, धुळे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना संबंधीतांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. सेवानिवृत्तीनंतर देखील मानसिक छळ आणि आर्थिक नुकसान सुरु ठेवण्यात आले आहे. एप्रिलच्या पगारातून ७ हजार ५०० रुपये आयकर कपात केली. प्रत्यक्षात मी आयकर विभागात फॉर्म नं.१६ मध्ये ७ हजार ११६ रुपयांचा भरणा केला आहे. भूषण शिरसाठ आणि विशाल साळूूंखे यांनी माझ्या ३८४ रुपयांचा अपहार केला आहे.
आस्थापना शाखेकडे शिल्लक रजेच्या पुस्तकाची मागणी केली आहे. परंतु ते मला मिळाले नाही. म्हणून भूषण शिरसाठ आणि विशाल साळूंखे यांच्यावर भादंवि कलम १६६, ४०९, ३५५, ४२०, ४७१, ४१८ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करेल असा इशारा विनायक चौधरी यांनी प्रशासनाला दिला आहे.

