धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची निवडणुकीसाठी जोरदार तयारी - एकजुटीच्या बळावर विजयी होण्याचा निर्धार..!
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- दि. १८ सप्टेंबर रोजी धुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन बळकट करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकांत काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर निश्चितच विजयी होईल असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काल कॉंग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतील, इच्छुकांची माहिती गोळा करतील, संभाव्य उमेदवारांची यादी तयार करतील आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर पक्षाची भूमिका निश्चित करतील. त्यात प्रामुख्याने नियुक्त निरीक्षकांची नावे साक्री विधानसभा श्री. भरत टाकेकर, धुळे ग्रामीण श्री. राजाराम पानगव्हाणे, धुळे शहर श्री. जावेद फारुकी, शिंदखेडा श्री. धनंजय चौधरी, शिरपूर श्री. रमेश कहानडोळे हे प्रमुख राज्याचे पदाधिकारी विधानसभा निरीक्षक म्हणून काम पाहतील. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील संघटन अधिक सक्षम व रणनीतीशील होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.
• भव्य कार्यकर्ता मेळावा आणि मार्गदर्शन सभा..!
काँग्रेस भवन, धुळे येथे काल आयोजित बैठकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
• खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा निर्धार..!
"पक्षासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. काँग्रेसचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवायचे असल्यास, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल. सर्वांनी एकत्रित काम करावे," असे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.
• जिल्हा प्रभारी पानगव्हाणेंचा विश्वास..!
"काँग्रेसचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निष्ठावान आणि मेहनती कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येईल," असे प्रतिपादन जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांनी केले.
• एकजुटीचा नवा अध्याय..!
ही बैठक म्हणजे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची सुरुवात असून, आगामी निवडणुकांत काँग्रेस पक्ष एकदिलाने, कार्यक्षम आणि विजयी लढा देईल, असा निर्धार यावेळी दिसून आला. काँग्रेस पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे!
• महत्त्वपूर्ण उपस्थिती आणि ठोस मागण्या..!
या बैठकीस डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रभारी पानगव्हाणे, शहर निरीक्षक जावेद फारुकी, शिंदखेडा निरीक्षक धनंजय चौधरी, शिरपूर निरीक्षक रमेश कहानडोळे, साक्री निरीक्षक भरत टाकेकर, जिल्हाध्यक्ष प्रविण चौरे, शहराध्यक्ष साबीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, महिला अध्यक्षा गायत्री जयस्वाल आणि इतर अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी शहर व जिल्हा कार्यकारिणी आठ दिवसात घोषित करण्याची मागणी केली तसेच काँग्रेसने आगामी निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी ठाम भूमिका मांडली. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह माजी खासदार बापू चौरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष हाजी साबीर शेठ, प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, डॉ.दरबार सिंग गिरासे, रमेश अण्णा श्रीखंडे, भाई नगराळे, पितांबर महाले, भानुदास गांगुडे, सुधीर जाधव, प्रमोद सिसोदे, गुलाब कोतेकर, नेर सरपंच गायत्री जयस्वाल, बानू बाई शिरसाट यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

