विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाणे घेतला जीव ; निष्पाप सुधाकर पाटील यांचा अपघाती मृत्यू !
नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या विरोधकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा
– भाजप कार्यकर्ते ललित माळी यांची जोरदार मागणी
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- देवपूर दत्तमंदिर परिसरातील वाहतुकीच्या गंभीर समस्येवर आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी कायमस्वरूपी तोडगा काढत भाजीपाला विक्रेत्यांना नवरंग पाणी टाकी जवळील २५० पक्की दुकाने देण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. मात्र, काही विरोधकांनी जनतेच्या हिताविरुद्ध घृणास्पद राजकारण करत प्रशासनाला अडथळा निर्माण केला.
दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी एस-मार्ट जवळ झालेल्या भीषण अपघातात वालखेडा येथील सुधाकर पाटील हे निष्पाप नागरिक बसखाली चिरडून ठार झाले. या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार ठरणारे म्हणजे तेच विरोधक, ज्यांनी भाजीपाला व किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यावर ढकलून वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वातावरण तयार केले.
आमदार साहेबांनी विक्रेत्यांना दिलेली जागा ही विकास, सुरक्षितता व स्थैर्याचं प्रतीक होती. पण, विरोधकांना जनतेचा फायदा पचला नाही. त्यांनी केवळ ‘विरोधासाठी विरोध’ करत नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण केला.
“देवपूर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी आणि जीवनाशी खेळ करणाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा प्रकार फक्त राजकारण नाही, तर जनतेशी केलेला घोर अपराध आहे. जनतेच्या जीवाशी खेळून राजकीय पोळी भाजणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही!” – असा जळजळीत इशारा भाजप कार्यकर्ते ललित माळी यांनी दिला.
आज धुळेकर जनतेत प्रचंड संताप असून, “जनतेच्या सुरक्षेला तडा देणारे, निर्दोष नागरिकांचा बळी घेणारे विरोधक” या शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.

