ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा तसेच ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करा अशा मागण्या करीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे सोमवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विशेषता मराठवाड्यासह इतर काही भागात पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतीची सुपीक माती वाहून गेलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला धान्यसाठा घरगुती वापरातील दैनंदिन वस्तू तसेच काही ठिकाणी घरे देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रचंड नुकसानीचा परिणाम फक्त शेतकऱ्यावरच नाही तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही मोठ्या प्रमाणात होणार आहे. घरांसह शैक्षणिक साहित्य नष्ट झा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आलं असून शिक्षणाच्या प्रवाहातून मोठ्या संख्येने मुले वगळली जाण्याची शक्यता आहे. शेतकरी एका वेळेच्या जेवणाची सोय करण्यासाठी संघर्ष करीत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करून ओला दुष्काळ जाहीर करावा व ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, केतन निकम, जिल्हा सचिव हर्ष मोरे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाणे, नीलिमा भामरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, दिनेश बैसाणे, विश्वजीत वाघ, शरद वेंदे, संदीप बोरसे, धनराज झाल्टे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

