16 जानेवारी धुळे मनपाची " खुलजा सिम सिम " कोण कोण होणार नगरसेवक ?
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून उद्या दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजे पासून सुरु होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना नेमूण दिलेल्या प्रभागानुसार सहा कक्षात एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. यात प्रथम टपाली मतपत्रीकांची गणना केली जाणार आहे. तनंतर प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात सुमारे १० ते १४ मतगणनेच्या फेरी होणार आहेत. यात प्रथम प्रभाग क्रमांक १,५,८,३,१४,१७ तद्नंतर प्रभाग क्रमांक २,६,१२,९,१५,१८ व नंतर ४,७,१३,१०,१६,१९ या प्रमाणे ३ टप्प्यात प्रभागनिहाय मतगणना करण्याचे नियोजन आहे. सदर गोदामातील मर्यादीत जागा लक्षात घेता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रभागनिहाय निश्चीत केलेल्या टप्पयानुसार मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम टप्यातील प्रभाग क्रमांकाची मतगणना पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील प्रभागांच्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येईल. यासाठी मतमोजणी कक्षालगत असलेल्या शेडमध्ये उर्वरीत उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधींसाठी प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रभाग निहाय टप्पा पूर्ण झाल्यावर ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येणार आहे.
मतमोजणी प्रकियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षेत मतगणना कर्मचारी पथक नियुक्त केलेले आहे. त्यांच्या नियंत्रणात मतगणना होणार आहे. सदर संपूर्ण प्रक्रियेप्रसंगी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री ओमकार पवार व निवडणूक निरीक्षक श्री देवदत्त केकान तसेच आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री नितीन कापडणीस उपस्थित राहणार आहे.
मतमोजणी कक्षात फक्त अधिकृत ओळखपत्रधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना फक्त बाहेरील प्रवेशव्दारापर्यंत वाहनाने सोडण्यास परवानगी आहे. मतमोजणी केंद्राच्या आत मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सक्त बंदी राहील. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना कोणत्याही परिस्थितीत मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास परवानगी नसेल. पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष असून पत्रकार कक्षात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तु बाळगू शकतात. सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

