धुळे लळिंग टोल नाक्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्याची मागणी
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- ऑल इंडिया पँथर सेना, धुळे जिल्हाच्या वतीने धुळे लळिंग टोल नाका प्रशासनाला निवेदन देऊन सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या संघटना, पदाधिकारी, नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने सागर भाऊ मोहिते यांच्या वतीने करण्यात आली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट च्या निवेदनात म्हटले आहे की, समाजावर कुठेही अन्याय, अत्याचार अथवा गंभीर घटना घडल्यास सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने त्या ठिकाणी जावे लागते. पीडितांना मदत, प्रशासनाशी समन्वय तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जिल्हा व राज्यभर दौरे करावे लागतात.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार हे देखील महाराष्ट्रभर सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने दौरे करत असून त्यांचे वाहन तसेच संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र (ID Card) देण्यात आले असून ID Card पाहून संबंधित वाहनांना विनाअडथळा सोडण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच अन्याय, अत्याचार व जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, पक्ष, नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांनाही टोलमुक्त सवलत लागू करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट च्या वतीने केली आहे.
दरम्यान, टोल प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ऑल India पँथर सेना, धुळे जिल्हाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते, धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे, शिरपूर तालुका अध्यक्ष दिपक भाऊ वाडिले धुळे शहर सचिव बंटी मगरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ सोनवणे, शुभम समदीर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
