
'आमची शेती वाहून गेली, आता जीवही द्यायचा का ? ; उडाणे-गोताणे येथील शेतकऱ्यांचा टाहो, कॅनॉलची दुरुस्ती न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातच आत्मदहनाचा इशारा!
जनसंघर्ष न्यूज
धुळे - तालुक्यातील गोताणे आणि उडाणे या गावांमध्ये सध्या एक अस्मानी नव्हे, तर प्रशासकीय दुर्लक्षाचे सुलतानी संकट कोसळले आहे. गावातून जाणाऱ्या एक्सप्रेस कॅनॉलला दोन ठिकाणी मोठे भगदाड पडल्याने, कालव्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि तब्बल अडीचशे हेक्टर सुपीक शेतजमिनीत घुसले आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावला गेला असून, शेकडो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. एकीकडे पिके पाण्याखाली सडत आहेत, तर दुसरीकडे घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या उध्वस्त झालेल्या संसाराची आणि शेतीची साधी पाहणी करण्याची तसदीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी न घेतल्याने, बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रूंचा आता तीव्र संतापात उद्रेक झाला आहे.
प्रशासनाच्या या अमानवीय व असंवेदनशील दुर्लक्षाला कंटाळून, अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी माजी जि.प. सभापती संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि आपल्या व्यथा निवेदनाद्वारे मांडल्या. या निवेदनात त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत कॅनॉलची तातडीने व कायमस्वरूपी सुरक्षित दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची आर्त मागणी केली आहे. "आमच्या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास, आम्हाला न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याच दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही," असा अत्यंत वेदनादायी आणि आक्रमक इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
