धुळ्यात महिला अत्याचाराविरोधात 'जन आक्रोश मोर्चा ; पोलिसांच्या दिरंगाईचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जनसंघर्ष न्यूज
धुळे - शहरातील साक्री रोड फुले नगर परिसरातील संतप्त महिलांनी महिला अत्याचाराविरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ 'जन आक्रोश मोर्चा' काढत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चामध्ये शेकडो महिला आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. महिलांवरील वाढते अत्याचार आणि पोलिसांची बघ्याची भूमिका याविरुद्ध मोर्चेकरी महिलांनी आपला तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
शहरातील एका महिलेसमोर तिच्या शेजारी राहणाऱ्या विकृताने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार ५ जून रोजी घडला होता. मात्र, या प्रकरणातील आरोपीचे नातेवाईक पोलीस दलात कार्यरत असल्याने धुळे शहर पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास तब्बल ४८ तासांचा जाणीवपूर्वक विलंब केला आणि आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या एकतर्फी आणि बेजबाबदार कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून मुख्य आरोपीवर तात्काळ कडक कारवाई व्हावी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संतप्त महिलांनी दिला आहे.
