विरोधी पक्षनेते पदासाठी एमआयएम चा एल्गार; धुळ्यात धरणे आंदोलन करत प्रशासनाला दिला इशारा..

0
विरोधी पक्षनेते पदासाठी एमआयएम चा एल्गार; धुळ्यात धरणे आंदोलन करत प्रशासनाला दिला इशारा.. 




जनसंघर्ष न्यूज 



धुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण एका हक्काच्या लढाईने चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे निकाल लागून सहा महिने उलटले, तरी विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याने अखेर एमआयएमने रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. शहरातील क्यूमाईन क्लब परिसरात आज पक्षाचे नेते इर्शाद भाई जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते धरणे आंदोलनात एकवटले. 'लोकशाहीत आमचा आवाज का दाबला जातोय?' असा सवाल करत, महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासन जाणीवपूर्वक आमच्या हक्कावर गदा आणत आहे, अशी संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. त्यांच्या चेहऱ्यावर सहा महिन्यांची प्रतीक्षा आणि व्यवस्थेविरोधातील चीड स्पष्ट दिसत होती.

हे आंदोलन केवळ राजकीय नसून, तो कायद्याच्या चौकटीतील हक्क असल्याचा ठाम दावा एमआयएमने केला आहे. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निकालानुसार, हे पद कोणत्याही नव्या आघाडीला न देता संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षालाच मिळायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला येत्या १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या काळात पदाचा सन्मान न मिळाल्यास, हा लढा केवळ रस्त्यापुरता न ठेवता थेट उच्च न्यायालयात दाद मागून शहरात तीव्र मोर्चा काढण्याचा खणखणीत इशाराही पक्षाने दिला आहे. त्यामुळे आता या आंदोलनानंतर प्रशासन कायदेशीर मार्गाने काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण धुळे शहराचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)