मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ; तक्रारदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न, उपायुक्तांच्या आश्वासनानंतर माघार

0

मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ; तक्रारदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न ; उपायुक्तांच्या आश्वासनानंतर माघार

जनसंघर्ष न्यूज 

​         धुळे - शहरातील वीर सावरकर मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर येथील एका गल्लीत बेकायदेशीर बांधकाम करून रस्ता बंद केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी नितीन शिंदे हे वर्षभरापासून मनपाकडे दाद मागत आहेत. आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही, अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव, हेमंत पावटे आणि मोनीष पाटील यांनी कारवाई न करता राजकीय दबावाखाली अतिक्रमणधारकाला पाठीशी घातल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, पैशांची मागणी पूर्ण न केल्याने अधिकाऱ्यांनी तक्रारदार शिंदे यांनाच त्यांचे घर पाडण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

​१६ तारखेला कारवाई न झाल्याने निराश झालेल्या नितीन शिंदे यांनी आज मनपा प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ते टोकाचे पाऊल उचलण्यासाठी आले असता, मनपा उपायुक्तांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढली. "आम्ही तुम्हाला कायदेशीर न्याय देऊ, असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका," असे ठोस आश्वासन उपायुक्तांनी दिल्यानंतर शिंदे यांनी प्रशासनाचा मान राखत आपला आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे. आता प्रशासन खरोखरच योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)