श्री गुरु अर्जन देव महाराज यांच्या पावन शहिदी गुरु पर्वा निमित्त गुरुद्वारात विविध कार्यक्रम संपन्न.

0

श्री गुरु अर्जन देव महाराज यांच्या पावन शहिदी गुरु पर्वा निमित्त गुरुद्वारात विविध कार्यक्रम संपन्न...

जनसंघर्ष न्यूज

धुळे :-  श्री गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या पावन शहीदी गुरुपर्वानिमित्त धुळे येथील गुरुद्वारा श्री गुरु नानक साहिब जी येथे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त वरद रक्त केंद्र, धुळे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिराला शीख समाज बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यासोबतच भाविकांसाठी शरबत वाटप करण्यात आले तसेच २४ तास अखंड गुरु दा लंगर आयोजित करण्यात आला होता. लंगरमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि सेवाभावी वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी अनेक शीख समाज बांधवांनी गुरुद्वारा श्री गुरु नानक साहिब जी येथे भेट देऊन गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या शहादतीस अभिवादन केले. समाजसेवा, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासंदर्भात माहिती देताना धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा दारा सिंग यांनी सांगितले की, गुरु अर्जन देव जी महाराज यांनी मानवतेसाठी दिलेले बलिदान हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान, शरबत सेवा आणि गुरु दा लंगर यांसारखे उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या शहीदी गुरुपर्वानिमित्त आयोजित या उपक्रमातून "मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा" हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)