हिंदी भाषा सक्तीविरोधात ; सत्यशोधक विद्यार्थी संघटना मैदानात
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरातील देवपुरातील चंदन नगर येथील बुद्ध विहारात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक रविवार दिनांक 29 जून रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल हे होते. बैठकीत उपस्थित सीनियर कार्यकर्ते सचिन बागुल, रोहिणी जगदेव, शरद वेंदे अमोल शिरसाट यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडत तत्कालीन संघटनात्मक आठवणींना उजाळा दिला. राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, सचिव तुषार सूर्यवंशी, माजी सचिव राकेश अहिरे, मनोज नगराळे, हर्ष मोरे यांनी संघटनेच्या ध्येय आणि धोरणात्मक बाबींवर विस्तृत मांडणी केली. बैठकीत संघटनात्मक वाढीविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीस उपस्थित असलेले संघटनेचे नवीन सदस्य केतन निकम धनंजय जगताप सिद्धार्थ बैसाणे अनिल वाघ नीलिमा भामरे इत्यादींची देखील मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकार लागू करत असलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध करीत त्याबाबतचे पत्रक प्रकाशित करण्यात आले. तसेच येत्या 20 जुलै रोजी धुळे जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबिर आयोजनाविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी डफाच्या साथीने विविध जागरगीते सादर केली. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात सोमवार दिनांक 30 जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

