धुळे बाजार समितीत शेतकरी भवनासाठी प्रस्ताव द्या, मी निधी आणतो! :- आमदार अग्रवाल

0

 

धुळे बाजार समितीत शेतकरी भवनासाठी प्रस्ताव द्या, मी निधी आणतो! :- आमदार अग्रवाल 

धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेतर्फे भव्य सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या असलेल्या शेतकरी भवनाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तेथे शेतकऱ्यांना मुक्कामासाठी अडचणी येत आहेत. बाजार समितीच्या सभापतींनी या भवनाच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव द्यावा किंवा तुमच्याकडे आणखी वेगळी जागा असेल, तर तेथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा. या भवनाच्या खाली एक सभागृह कामगारांच्या बैठकीसाठी उपलब्ध करा. प्रस्ताव मिळाल्यानंतर लवकरच भवनाच्या बांधकामासाठी शासनाकडून ३ ते ४ कोटींचा निधी उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज दिली.

      धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे आज येथील बाजार समितीत आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती यशवंत खैरनार, उपसभापती नानासाहेब पाटील, धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, बाजार समितीचे संचालक भागवत चिळकर, महादेव परदेशी यांचा सत्कार झाला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. सत्कारमूर्तींसह माजी नगरसेवक अमोल मासुळे, विशाल सैंदाणे, बबलू सैंदाणे यांच्यासह महिला-पुरुष हमाल- कामगार उपस्थित होते.


      कामगार भवनासाठीही पाठपुरावा


आमदार अग्रवाल म्हणाले, की नुकताच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदीचा निर्णय झाला आहे. मात्र, यामध्ये ज्याच्याकडे बाजार समितीचा शेतमाल खरेदीचा परवाना असेल, तोच थेट बांधावर जाऊन शेतमालाची खरेदी करू शकणार आहे. याबाबत हमाल-मापाडी कामगारांचा जो प्रश्न आहे, त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात नक्कीच आवाज उठवेन. यदाकदाचित या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करता आला नाही, तर पुढील अधिवेशनात नक्कीच हा मुद्दा मांडीन. कामगार भवनासाठीही मी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करीन. कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. कोळेकर, श्री. चितळकर यांनी त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने संबंधित विभागाकडे सादर करावा, असेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले. 


शहराची दशा-दिशा बदलण्यासाठी कटिबद्ध


आमदार अग्रवाल म्हणाले, की शहरात विविध समस्या आहेत. विकासाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. एमआयडीसीसाठी रावेर परिसरातील दोन हजार एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. लवकरच ही जागा उपलब्ध होईल. या औद्योगिक वसाहतीत साडेआठ हजार कोटींचे उद्योग येणार आहेत. तसा करार झाला आहे. त्यातून शहराचा कायापलाट होणार आहे. यातून हजारो युवकांना रोजगार, नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. माझे प्राधान्य उद्योगवाढीसाठी आहे. तसे झाले तरच शहराची दशा आणि दिशा बदलेल. सुरत बायपासलगतच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगतच्या जागेवर दोन दिवसांत १० हजार वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू होत आहे. तेथे अशोक वाटिका उभारण्यात येत आहे.


कामगारांसाठीच्या योजनांचा लाभ घ्या : आ. अग्रवाल

आपल्या काहीही समस्या असतील, तर त्या आवर्जून सांगा. कामगारांसाठी सरकारच्या विविध प्रकारच्या ४५ ते ४६ योजना आहेत. या योजनांची माहिती घ्या. पात्र असलेल्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची कामगार विभाग, समाजकल्याण विभागासह अन्य विभागांकडे पूर्तता करा. काही अडचणी असतील माझ्याशी संपर्क साधा. त्या सोडविण्यासह योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माझा सातत्या प्रयत्न राहील. बाजार समिती प्रशासनानेही काही कामांबाबत अडचणी असतील, तर त्या सांगाव्यात. आपण सारे मिळून शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही आमदार अग्रवाल यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)