रि.पा.ई ( आठवले ) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन

0



रि.पा.ई ( आठवले ) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन


जनसंघर्ष न्यूज 

        चांदवड :- शहरात बाजारतळातील पेटीशॉपचे गाळे मिळण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि 18 जुलै 2025, शुक्रवार रोजी नगरपरिषदेसमोर ठिय्या  आंदोलन करण्यात आले व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

        चांदवड शहरातील बाजारतळातील अतिक्रमणाच्या जागेत असलेले दुकाने काढण्यात आलेले होते. हे दुकाने काढल्यानंतर हे दुकानदार बेरोजगार झालेले आहेत. मागील 15 ते 20 वर्षांपासून यांची दुकाने बाजारतळात आहेत. नगरपरिषदेने सांगितल्याप्रमाणे या दुकानदारांनी स्वत:हुन त्यांची दुकाने काढून घेतले. या दुकान‌दारांवर उपासमारिची वेळ आलेली आहे. 'आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी चालवायची?', असा प्रश्न या दुकानदारांना पडलेला आहे. यामुळे बाजारतळात जे पेटीशॉपचे गाळे बांधण्यात येत आहेत ते गाळे शासनाने या टपरीधारकांना तुटपुंज्या मानधनावर देण्यात यावे. तसेच शहरातील विधवा, अपंग व निराधार महिलांना देखील हे गाळे देण्यात यावे.

       नगरपरिषदेने बाजारतळातील टपऱ्या काढल्या यामुळे या टपरीधारकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. कालांतराने बाजारतळात जे सिमेंट कॉन्क्रिटचे गाळे व कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल तेव्हा या सर्व लोकांना हे गाळे देण्यात यावे. या टपरी धारकांची गैरसोय होऊ नये, म्हणुन लवकरात - लवकर या दुकानदारांची पेटीशॉप गाळयांमधे सोय करण्यात यावी. पेटीशॉपच्या गाळयांचा लिलाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनी संगनमताच्या लोकांना देऊ नये. गाळयांच्या बदल्यात जास्त पैशांच्या वसुलीसाठी दुकानदारांची छळवणूक व पिळवणूक करू नये. नगरपरिषद अधिकाऱ्यांनी या गोर-गरिब व कष्टकरी गाळा धारकांवर जाचक अटी व शर्ती लादू नयेत.

       चांदवड तालुका ग्रामीण असल्याने येथे रोजगार नाही. यामुळे ज्या लोकांनी बाजारतळातील गाळे मिळण्यासाठी नगरपरिषदेला अर्ज दिलेले आहेत, त्या सर्व लोकांना वार्षिक तुटपुंज्या मानधनावर पेटीशॉपचे गाळे देण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात  येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल, याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सर्व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)