स्वातंत्र्यदिनी एबी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
खंडेराव मंदिराजवळ गरजू नेत्ररुग्णांना चष्म्यांचे मोफत वितरण
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेसह त्यांच्या दातृत्वातील एबी फाउंडेशन आणि आकाशदादा साखला मित्र परिवार व विकीबाबा परदेशी मित्र परिवारातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जुन्या आग्रा रोडवरील खंडेराव मंदिराजवळ शुक्रवारी (ता. १५) मोफत आरोग्य तपासणी शिबिर होईल. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांच्या तपासणीसह गरजू नेत्ररुग्णांना चष्म्यांचे मोफत वितरण होईल. तसेच रक्तदान शिबिराचा उपक्रम होईल. शिबिराचा धुळेकर नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एबी फाउंडेशनसह समन्वयकांनी केले.
येथील आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रपटगृहालगत खंडेराव बाजार परिसरात शुक्रवारी (ता. १५) सकाळी नऊला होणाऱ्या या आरोग्य शिबिराचे भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त डॉ. अमिता दगडे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक देवा देवगावकर, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित असतील.
या शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, कॅन्सर, दंत आदी आजारांची तपासणी व गरजू रुग्णांवर आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. या शिबिरात अत्याधुनिक यंत्रांद्वारे कॅन्सर रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना संदर्भ सेवा व पुढील उपचारांसाठी एबी फाउंडेशनतर्फे मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये दाखल केले जाईल व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. यावेळी नेत्र तपासणी झालेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार नंबरच्या चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर आवश्यकता भासल्यास एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत शस्रक्रियाही करण्यात येणार आहेत. ज्या रुग्णांना हृदयरोग तपासणीदरम्यान शस्रक्रियेची गरज भासेल त्यांच्यावर मोफत शस्रक्रियाही करण्यात येणार आहेत. यावेळी रक्तदान शिबिर होणार असून, रक्तदान करणाऱ्या दात्यांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे.
नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. वैद्यकीय मदतीसाठी ए.बी. फाउंडेशनच्या मदत कक्षाशी 8055556990 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधाव, असे आवाहन एबी फाउंडेशन, आकाशदादा साखला मित्र परिवार व विकीबाबा परदेशी मित्र परिवाराने केले.

