अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवांतर्गत २४ रोजी धुळ्यात प्राथमिक फेरी

0

 

अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवांतर्गत २४ रोजी धुळ्यात प्राथमिक फेरी 

नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - प्रतिनिधी 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव घेण्यात येत आहे. याअंतर्गत धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात दिनांक २४ ऑगस्ट रोजी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे अशी माहिती अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा स्पर्धा केंद्र प्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की, अ.भा. नाटय परिषद दादर, मुंबई मध्यवर्ती संस्थेतर्फे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात २२ केंद्रात भव्य एकांकिका स्पधेचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २५ केंद्रात भव्य एकांकिका स्पर्धा घेतली जाणार आहे. या एकांकिका स्पर्धेची  प्राथमिक फेरी धुळे शहरात येत्या २४ ऑगस्ट, रविवार रोजी होणार आहे. या एकांकिका स्पर्धेसाठी धुळे शहरातून ९ नाट्य संस्थांनी आपला सहभाग नोंदविला असून शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे केंद्रावर होणाऱ्या स्पर्धेत आकाश वाघ यांचा एम के शिंदे महाविद्यालय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे या संघातर्फे 'रात्र वैऱ्याची हाय', सुभाष शिंदे यांच्या रंगदेवता नाट्यसंस्था संघातर्फे 'प्रोफेश्वर पाहिजे', राज वाघ यांच्या क्रांती कृषी बहुउद्देशीय संस्था धुळे संघातर्फे 'सावळा', शशिकांत भगवान नागरे यांच्या हेल्पी फाउंडेशन लळिंग, धुळे संघातर्फे 'कुछ तो लोग कहेंगे', आदेश सावंत यांच्या मॅड स्टुडिओ धुळे संघातर्फे 'कलंदर', राहुल चौधरी यांच्या अजंता आर्ट्स सर्कल संघातर्फे 'बिल', सचिन बागुल यांच्या राज क्रिएशन संघातर्फे 'घरघर', हर्षल राजेश परदेशी यांच्या शासकीय विद्यानिकेतन धुळे संघातर्फे 'वासुदेव आला रे', मंदार तोरणे कर यांच्या हिरे मेडिकल कॉलेज संघातर्फे 'खेळ कुणाला नशिबाचा कळला' या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, ठाणे, नवी मुंबई, मुंबई या केंद्रांवरही २३ व २४ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, माहीम, मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ आणि १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होईल. स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमेची पारितोषिके कलावंत व तंत्रज्ञांना दिली जाणार आहेत. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्य क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. धुळे येथील प्राथमिक फेरीचे संयोजन नाट्य परिषदेचे धुळे शाखाप्रमुख सुनील नेरकर, समन्वयक हर्षल परदेशी, लोकेश चौधरी, शशिकांत नागरे यांच्यातर्फे केले जात असल्याचीही माहिती चंद्रशेखर पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)