संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट होणार

0



संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट होणार 

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश :- आनंद सैंदाणे

 जनसंघर्ष न्यूज 

धुळे :-  येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस क्रमांक 2) या वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी काल दिले. त्यामुळे लवकरच संदेशभूमी ऐतिहासिक वास्तुंच्या यादीत समाविष्ट होणार असून हीबाब धुळेकरांसाठी अभिमानाची असल्याचे संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाणे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षांनी काल घेतलेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी आनंद सैदाणे यांनी आज संदेशभुमी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी बैठकीची माहिती देतांना सांगितले की, विधानभवन येथे धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या. तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाणे, सामाजिक न्याय विभाग धुळेचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे आदी उपस्थित होते. बैठकीत उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत मोलाची आहे. धुळेकरांसाठी ही वास्तू अभिमानाची बाब असून, डॉ. आंबेडकरांच्या स्मृतींशी निगडीत हा ठेवा ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तिचा ऐतिहासिक वास्तूत समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी विसपुते यांना, संबंधित जागेची कागदपत्रे त्वरीत अद्यावत करून घेण्याच्या सुचना केल्या. या विषयावर सामाजिक न्यायमंत्री यांच्या उपस्थितीत पुढील बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याची  माहितीही त्यांनी दिली.

या पत्रपरिषदेला सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी,दादाभाऊ अभंग, पूज्य भंन्ते आनंद थेरो, रविंद्र आघाव, विजय सुर्यवंशी, शोएब शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)