महसूल नायब तहसीलदाराचा पापाचा घडा भरला
२ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
जनसंघर्ष न्यूज
नाशिक - जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात महसूल विभागात कार्यरत असलेले लोकसेवक महसूल नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर वय ५१ वर्षे यांना नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख ५० हजार रुपये लाज घेताना रंगेहात पकडल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा व सुनेच्या नावे मौजे दोडी खुर्द ता. सिन्नर, जि. नाशिक येथील ग.नं. ४९९, क्षेत्र ३ हे ६० आर शेत जमिन खरेदी केली होती. सदर खरेदी खतावरुन तलाठी दोडी खुर्द यांनी घेतलेल्या फेरफार नोंद क. ३३४५ हि रद्द होण्याकरीता दिलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदार यांच्या मुलाच्या व सुनेच्या बाजुने लावुन देवुन, त्यांचेकडे सुनावणीकामी असलेली फेरफार नोंद क. ३३४५ ही मंजुर करुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक महसूल नायब तहसीलदार यांनी दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे १०,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम रिकारण्याचे मान्य केले होते.
तक्रारदार यांनी सदर घटनेबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या कार्यालयाला भेट देऊन तक्रार केली असता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्री. रूपाली खांडवी यांनी पथकाच्या मदतीने दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सापळा रचून कारवाईचे आयोजन केले असता आरोपी लोकसेवक यांनी सोपान हॉस्पीटल समोर रोडाच्याकडेला नाशिक येथे लाचेची रक्कम २,५०,०००/- रुपये तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, ला.प्र.वि. नाशिक सह सापळा पथकातील पो. हवा/संदिप वणवे, पोकों/प्रमोद पाळदे पोहवा/शरद हॅबाडे, पोहवा/युवराज खांडवी यांनी केली.
लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.

