धुळ्याच्या विकासाची धमक फक्त भारतीय जनता पक्षाकडेच :- आमदार अमरीश भाई पटेल
प्रभाग ११ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे, ता. १२ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्ष नियोजनपूर्वक धुळे शहराचा विकास साधत आहे. यात केंद्र, राज्य आणि महापालिकेत भाजपची सत्ता असणे हा खूप महत्त्वाचा घटक ठरला आहे. आताही महापालिकेत भाजपची सत्ता आली नाही, तर धुळे शहराची विकासात पुन्हा पिछेहाट होईल. ते टाळण्यासाठी धुळे शहरवासीयांनी महापालिकेसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हाती सोपवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
धुळे महापालिका निवडणुकीतील भाजपचे प्रभाग ११ मधील उमेदवार रोहित चांदोडे, मायादेवी परदेशी, कल्पना महाले आणि चेतन गवळी यांच्या प्रचारार्थ जमनालाल बजाज रोडवर रविवारी रात्री कमळ विजय संकल्प सभा झाली, तीत आमदार पटेल बोलत होते. यावेळी आमदार अनुपभय्या अग्रवाल, नंदलाल ऋणवाल, चेतन मंडोरे, सागर कोडगीर, पप्पू डापसे, सत्यजित शिसोदे, तुषार भागवत, राजेश गिंदोडिया तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार पटेल भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर प्रकाशझोत टाकताना म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यासह देशात भक्कम पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. दोन्ही सत्ताकेंद्रांच्या सहकार्याने धुळे महापालिकेतही भाजपची सत्ता असताना शहराचा गंभीर झालेला पाणीप्रश्न सोडविला गेला. अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटाराचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता दुसरा टप्पा सुरू होत आहे. पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरात पायाभूत सुविधांची निर्मिती करताना रस्ते, व्यापारी संकुलांची कामे मार्गी लागत आहेत. यातून असंख्य बेरोजगार तरुणांसह महिलांनाही हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. यातून शहराच्या उद्यमशीलतेत वाढ होऊन आर्थिक प्रगतीला हातभार लागणार आहे. रावेर एमआयडीसीसारखा प्रकल्प मंजूर होण्यासाठी आमदार अग्रवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वी विरोधकांनी काय विकास केला आणि भाजपच्या नेतृत्वात गेल्या सहा-सात वर्षांत काय विकास झाला, याची तुलना करून शहरातील मतदारांनी आता सकारात्मक दृष्ट्या विचार करून मतदान करण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या १५ जानेवारीला भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून त्यांना विजयी करण्याचे आवाहनही आमदार पटेल यांनी केले.
विरोधकांकडे फक्त आरोप करण्याची वृत्ती
आमदार अग्रवाल म्हणाले, की विरोधकांकडे विकासाचे कुठलेच मुद्दे नसल्याने ते माझ्यासह भारतीय जनता पक्षावर आता विविध आरोप करू लागले आहेत. विरोधकांकडे सत्ता असताना त्यांनी ठळकपणे सांगता येईल, अशा एका तरी कामाचा दाखला द्यावा. आम्ही गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शहराचा गंभीर पाणीप्रश्न सोडविला. भूमिगत गटारांचे काम मार्गी लावले. १८ डीपी रस्त्यांचे काम पूर्ण केले. शहरातील कॉलनी-कॉलनीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. मी आमदार झाल्यापासून एक वर्षात तब्बल १५० ते २०० कोटींचा निधी आणण्यात यशस्वी झालो असून, त्याद्वारे शहरात पाचकंदील मार्केटचे नूतनीकरण, दसेरा मैदानालगत व्यापारी संकुल, नवरंग जलकुंभाजवळ नवीन मॉल व भाजी मंडई, संत सावता माळी मार्केटचे नूतनीकरण करून असंख्य युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय टॉवर गार्डन, पांझरा नदीकाठी भारतरत्न गार्डन, एकवीरा मंदिरासमोर ५१ शक्तिपीठ, पांझरा रिव्हर फ्रंट प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, वीर सावरकरांचे स्मारक आदी कामांतून शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना दिली आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता असल्याने पुढील पाच वर्षांतही भरघोस निधी आणण्याची ताकद फक्त भाजपकडे असून, त्यासाठी पुन्हा एकदा भाजपकडे महापालिकेची सत्ता सोपवावी, १५ जानेवारीला जास्तीत जास्त मतदान करून भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.


