“पक्ष्यांची तहान भागविण्याचा संकल्प; ‘मी धुळेकर’तर्फे मातीच्या वाडग्यांचे वितरण”
जनसंघर्ष न्यूज
धुळे : वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी मातीच्या वाडग्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अँड. चैतन्य भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. तसेच अनेक झाडे सुकल्याने पक्ष्यांना पाणी व अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घरांच्या छतांवर व अंगणात पक्ष्यांसाठी पाणी व दाण्यांची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जाणीव, आपुलकी आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने रवींद्रनाथ टागोर शाळा येथील विद्यार्थ्यांना मातीचे वाडगे वाटप करण्यात आले. यावेळी अँड. चैतन्य भंडारी यांनी विद्यार्थ्यांना निसर्गासाठी पक्ष्यांचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने पक्ष्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे संचालक विनायक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास निरंजन भतवाल, छोटूभाऊ पोतदार, दिनेश वाघ, फरदीन शेख तसेच मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

