![]() |
| मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली पावसाळ्यापूर्वी शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याबाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना सादर करताना पदाधिकारी |
जनसंघर्ष न्यूज
धुळे : शहरातील रस्त्यांवरील गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील मुख्य रस्ते तसेच कॉलनी परिसरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना ते वेळेवर लक्षात येत नाहीत. त्यामुळे अचानक ब्रेक लावावे लागून वाहन चालकांचा तोल जाण्याची शक्यता वाढत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने लहान-मोठे अपघात घडत असून वाहनांचे नुकसानही होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. आता पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात रस्ते ओले असल्याने अचानक ब्रेक लावल्यास वाहने घसरण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी “मी धुळेकरचे" अध्यक्ष निरंजन भतवील, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोतदार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते.

