पारोळा रोडवर भीषण अपघात ; वरखेडे गावातील तिघांचा जागीच मृत्यू
परिसरात शोककळा, पोलिसांचा तपास सुरू
जनसंघर्ष न्यूज
धुळे - पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्स जवळ लक्झरी बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात वरखेडे गावातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की घटनास्थळीच तिघांनी प्राण गमावले. या दुर्घटनेमुळे वरखेडे गावासह धुळे शहरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून ते सर्व वरखेडे गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

