परळी युवक हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा
जनकल्याण मानवता मिशनच्या वतीने मागणी
जनसंघर्ष न्यूज
परळी वैजनाथ, प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील युवक तोहिद केरातोवाण पगण यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी जनकल्याण मानवता मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष फिरोज गफ्फार शेख यांनी ही मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तोहिद केरातोवाण पगण यांची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह रेल्वेमार्गावर फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व जलद चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच हत्येमागील संपूर्ण कट, कारणे व संबंधित बाबींचा तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे तसेच पीडित कुटुंबास आवश्यक संरक्षण व मदत उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

