लोकसेवकांशी हुज्जत घालणे पडलं महागात ; शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसात गुन्हा दाखल

0


 लोकसेवकांशी हुज्जत घालणे पडलं महागात 

शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसात गुन्हा दाखल 

चौघांपैकी तिघांना अटक एक फरार

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे / साक्री (प्रतिनिधी): ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावून, शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या चौघांपैकी तिघांना निजामपूर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जून २०२६ रोजी रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास जैताणे (ता. साक्री, जि. धुळे) येथील नवीन ग्रामीण रुग्णालयात ३ ते ४ इसम आले. त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी श्रीमती मोनाली कोठावदे व नर्सिंग स्टाफ यांच्याशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली.

      घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपींनी पोलिसांशीही हुज्जत घालत वादविवाद केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलिसांना दमदाटी करत मारहाण केली.

      याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात (१) सनी बोरसे, (२) दिपक जाधव, (३) शाम न्याहळदे आणि (४) बापू नानाभाऊ धनगर (सर्व रा. जैताणे, ता. साक्री) यांच्याविरुद्ध गु.र.नं. २०९/२०२६ BNS कलम १३२, १२१(१), ३(५) प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सर्व आरोपी फरार झाले होते.

       निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. मयुर भामरे यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत तात्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकाने १८ जून २०२६ रोजी धाडसी कारवाई करत १. सनी त्र्यंबक बोरसे (रा. जैताणे) - याला चितोडरोड चौफुली, अजळकर नगर, धुळे येथून ताब्यात घेतले. , २. दिपक कैलास जाधव (रा. जैताणे) ,३. शाम छोटु न्याहळदे (रा. जैताणे ) या तिघांना अटक करून सन्माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०३ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील चौथा फरार आरोपी बापू नानाभाऊ धनगर याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.


कायद्याची तरतूद - 

लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केल्यास, दोन वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड (दंड) किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद कायद्यात आहे.


या पथकाने केली कारवाई-

सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. मयुर भामरे, सपोनि. प्रियदर्शनी थोरात, पोउनि. मधुकर सोमोसे आणि पोलीस अंमलदार प्रदिपकुमार आखाडे, नारायण माळचे, रतन मोरे, सुजित देवरे, राकेश महाले, टिलु पावरा, गौतम अहिरे व वारलवाड यांनी केली आहे. मामलेदार पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)