धुळ्यात माजी सैनिक आणि जवानांची घर बांधणीत फसवणूक ; निकृष्ट बांधकाम करून धमकावणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी
जनसंघर्ष न्यूज
धुळे - शहरातील रामनगरासह परिसरातील माजी सैनिक व जवानांची घर बांधणीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीएसएफ जवान विनोद बोरसे आणि माजी सैनिक कृष्णा शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांनी ठेकेदारांवर निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. निवेदनानुसार, महेश पाटील, निशांत पाटील, संदीप पाटील आणि इतर संबंधित ठेकेदारांनी करारानुसार लाखो रुपये घेऊनही अत्यंत दुय्यम दर्जाचे साहित्य वापरले. यामुळे घरांना अवघ्या काही महिन्यांतच भेगा पडणे, गळती सुरू होणे आणि प्लास्टर निखळणे असे प्रकार घडले असून, घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
बँकेकडून ३० लाखांपर्यंतचे कर्ज काढून आणि आयुष्यभराची पुंजी पणाला लावून घरे बांधणाऱ्या या जवानांनी न्याय मिळवण्यासाठी आता धुळे पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. या सदोष बांधकामाबाबत जाब विचारला असता संबंधित ठेकेदारांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही तक्रारदारांनी केला आहे. यापूर्वी स्थानिक आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, आता थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त जवान आणि नागरिकांनी केली आहे.
