इलेक्ट्रिक पाण्याची मोटार चोरी प्रकरणाचा उलगडा ; धुळे तालुका पोलिसांची कारवाई
एक आरोपी जेरबंद, ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
जनसंघर्ष न्यूज
धुळे - तालुका पोलिसांनी इलेक्ट्रिक पाण्याची मोटार चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ मे २०२६ रोजी कुसुंबा शिवारातील जानाबारा धरण परिसरात शेतकरी बल्लभ काशिनाथ माळचे (रा. मेहेरगाव, ता. जि. धुळे) यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१४/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित दिपक नाना मोरे (वय २०, रा. बलानो, ता. जि. धुळे) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ५ एचपीची जलपरी पाण्याची मोटार, आणखी एक पाण्याची मोटार तसेच स्प्लेंडर मोटारसायकलचा समावेश असून एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

